जाहिरात करामुळे महापालिकेच्या उत्पन्नात भर

  पिंपरी, दि. १६ – महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाला २०११-१२ या आर्थिक वर्षात ३ कोटी ९३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यापैकी जाहिरात करातून सर्वाधिक ३ कोटी २४ लाख रुपये, तर उद्योगधंदा परवाना व व्यवसाय साठा परवान्यातून अवघे ६८ लाख ३७ हजार रुपये उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले. पिंपरी – चिंचवड महापालिकेने एकूण ७ हजार २२० परवाने विविध उद्योग धंद्यांना दिले आहे. परंतु त्याहीपेक्षा जाहिरात कर आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या उत्पन्न वाढीला हातभार लावत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
    उद्योगधंदा परवाना शुल्काच्या माध्यमातून ५३ लाख ४५ हजार ८९९ रुपये, अर्ज विक्रीतून १३ हजार ८०५ रुपये आणि दंड व इतर माध्यमातून १४ लाख ७८ हजार ११६ रुपये उत्पन्न आकाशचिन्ह विभागाला मिळाले आहे. २०१२ -१३ या आर्थिक वर्षापासून जाहिरात परवाना आणि करामध्ये वीस टक्के आणि उद्योगधंदा परवाना व व्यवसायसाठा परवाना शुल्कात ५० टक्के वाढ करण्यास सर्वसाधारण सभेने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात या विभागाच्या उत्पन्नात आणखी वाढ होईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे यांनी दिली.

Leave a Comment