बिबट्याचा मृत्यू की शिकार

आष्टी, दि. १५ – परिसरातील तळेगाव श्यामजीपंत वनपरीक्षेत्रांतर्गत सिंदी विहीरी शिवारात ४ ते ५ वर्षाचा बिबट्या मृतावस्थेत आढळला. घटनास्थळी मासोळ्याही आढळून आल्या. ही घटना १३ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या बिबट्याचा मृत्यू की शिकार?  याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे.
    कक्ष क्रमांक ४९/०१ मध्ये येणार्‍या सिंदी विहीरी शिवारात १३ एप्रिल रोजी वनरक्षक जी. जी. टाक, वनमजूर सुरेश कोल्हे गस्त घालत होते. दरम्यान दुपारी ४ च्या सुमारास त्यांना चार पाच वर्षाचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या बाजूला मासोळ्याही पडलेल्या होत्या त्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांना दिली. यावरून सहाय्यक वनसंरक्षक एल. व्ही. स्वामी, वनपरिक्षेत्र अधिकारी तळणीकर, क्षेत्रसहाक सादुल्ला, वनरक्षक माहुरे, धामंदे, आजने यांच्यासह फिरते पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतावस्थेत असलेल्या बिबट्याचा पंचनामा करून त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. शनिवारी तळेगाव येथील शासकीय आगारात मृतावस्थेत असलेल्या बिबट्याला आणून सकाळी ७ वाजता पशुअधिकारी कोल्हे यांनी शवविच्छेदन केले. बिबट्याच्या मृतदेहाच्या बाजूला मासोळ्या आढळून आल्याने तर्क-वितर्क लावले जात आहे.
सव्वा वर्षात ८० बिबट्यांचा मृत्यू
राज्यात गेल्या सव्वा वर्षात ८० बिबट्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाल्याची धक्कादाय माहिती उघडकीस आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा बिबट्यांच्या मृत्यूच्या संख्येत २५ टक्के वाढ झाल्याचे आकड्यांवरून स्पष्ट होते. सव्वा पाच वर्षात राज्यात २८५ बिबट्या मरण पावले आहेत. बिबट्ये मरण्याची कारणे अद्याप वनविभागाला समजली नाही.
    बिबट्या मानवी वस्तीच्या जवळपास वास्तव्य करणारा वन्यप्राणी आहे. यामुळे पाळीव प्राण्यांना धोका निर्माण होऊ शकतो. या भीतीने अनेक ठिकाणी विषप्रयोग करण्यात आल्यानेही बिबट्यांना जीव गमवावा लागला. बिबट्यांची संख्या वाढू लागल्याने त्यांचे मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बिबट्या आणि गावकर्‍यांमध्ये संघर्ष होतो. त्यातूनही माणसे जखमी होत असताना जानेवारी २०११ ते मार्च २०१२ या कालावधीत ८० बिबट्या मरण पावले.

Leave a Comment