तीन तालुक्यांना एकच क्रीडाधिकारी खेळाडूंची गैरसोय

पंढरपूर, दि. १३ – पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा या तीन तालुक्यासाठी एकच क्रीडाधिकारी असल्यामुळे तीन तालुक्यातील विद्यार्थ्यांना खेळापासून वंचित रहावे लागत आहे. शासनाच्या उदासिन भूमिकेमुळे पालकामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शरीर तंदुरूस्त राहण्यासाठी खेळ आवश्यक असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना कब्बडी, खो- खो, व्हॉलीबॉल, कुस्ती, बॅडमिंटन, धावणे असे विविध देशी खेळ शिकविले जातात.
    या खेळासाठी शासन प्रत्येक तालुक्यात क्रीडा मैदाने उभी करीत आहेत. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तालुका, जिल्हा, राज्य स्तरावर स्पर्धा घेतल्या जातात. विद्यार्थ्यांनी खेळाकडे वळावे म्हणून, शासनाने शालेय स्तरावर जादा गुण देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नोकर भरतीमध्येही क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना विशेष सवलत दिले जाते. त्यामुळे क्रीडा क्षेत्राकडे अधिकाधिक विद्यार्थी वळत आहेत. पंढरपूर शहरात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, धावणे यासाठी नगरपरिषदेने मध्यवर्ती मोठी जागा क्रीडा कार्यालयास दिली. त्या जागेवर अत्याधुनिक मैदान तयार करण्यासाठी शासनाने ९० लाख रूपयांचा निधी दिला. या निधीमधून २५ लाख रूपयांचा बॅडमिंटन हॉल बांधण्यात आला आहे.
    बॅडमिंटन हॉलचा वापर शासकीय कर्मचारी करतात. विद्यार्थ्यांना मात्र त्याचा लाभ होत नाही. तीन तालुक्यांसाठी एकच क्रीडाधिकारी असल्यामुळे पंढरपूर येथील क्रीडा कार्यालय नेहमी बंद असते. त्यामुळे खेळाडूंना खेळासाठी साहित्य व प्रशिक्षक उपलब्ध होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होत आहे. तरी शासनाने पंढरपूर, सांगोला, मंगळवेढासाठी वेगवेगळे क्रीडाधिकारी नेमावे जेणेकरून विद्यार्थ्यांना खेळाचा लाभ घेता येईल अशी मागणी पालकांकडून होत आहे.

Leave a Comment