बैलगाडा शर्यतबंदी जिल्हाधिकारी आणि ग्रामीण पोलीस अधिक्षकांना नोटीस

पुणे, दि.१५  – महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार राज्यात बैलगाड्याच्या शर्यतीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, राज्यभरासह जिल्ह्यातही शासनाला या शर्यती रोखण्यात अपयश आले आहे. या विरोधात महाराष्ट्र प्राणी कल्याण समितीचे अनिल कटारिया यांनी जिल्ह्याधिकारी आणि ग्रामीण पोलीस अधिक्षक यांना न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. तसेच यासदर्भात आजपर्यंत केलेल्या  कारवाईचा तपाशीलही मागवण्यात आला आहे.
     जिल्ह्यात भोसरी, चाकण, अलिबाग, मुरूड, मंचर आदी भागांत सर्रासपणे मनोरंजन म्हणून बैलगाडा शर्यती घेतल्या जातात. यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. मात्र, अद्याप कुणावरही ठोस कारवाई करण्यात आली नाही. मात्र, जिल्हाधिकारी आणि ग्रामीण पोलीस यामध्ये सपशेल फोल ठरले आहेत. समाधानकारण माहिती न मिळाल्यास न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे कटारिया यांनी सांगितले आहे.    
    दरम्यान, महाराष्ट्र शासनाने ११ जुलै २०११  रोजी बैलाच्या शर्यती, मनोरंजन, प्रदर्शन बेकायदेशीर असल्याचा अद्यादेश काढला. तसेच १२ मार्च २०१२ रोजी १९६० च्या प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यानुसार बैलांना इजा पोहचवणार्‍या शैर्यती, झुंज, प्रशिक्षण, कार्यकौशल्य आदी प्रकारांवर बंदी घालण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच असे करणार्‍यास किंवा करवून आणणार्‍यास २०० रुपये दंड आणि एक वर्षाचा कारावास या शिक्षेची तरतूद  करण्यात आली आहे.

Leave a Comment