इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीविरोधात ऑटोरिक्षा चालकांचा आजपासून संप

नागपूर, दि. १५ –  इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीविरोधात ऑटोरिक्षा चालकांनी १६ एप्रिलपासून संप पुकारला असला तरी विदर्भात ऑटो रिक्षाचालक काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक कृती समितीचे कार्याध्यक्ष विलास भालेकर यांनी सांगितले. प्रवाशांसाठी शासनाने पर्यायी व्यवस्था केली आहे.
    इ-मीटर सक्तीविरोध तसेच भाडे वाढवून देण्याची राज्यातील ऑटोरिक्षा चालकांची मागणी आहे. विदर्भात सुमारे ८० हजार परवानाधारक, तर परवाना नसलेले सुमारे एक लाख अवैध ऑटोरिक्षा विदर्भात चालतात. नागपूर शहरात सुमारे २५ हजार ऑटोरिक्षांपैकी केवळ ८ हजार ऑटोरिक्षा परवानाधारक असून ५ हजार ऑटोरिक्षांना मीटर असल्याचे सांगितले जाते.
    संप काळात प्रवाशांचे हाल होऊ नये, यासाठी शासनाने पर्यायी व्यस्था केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना अधिक सेवा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खाजगी मालकीच्या वाहनातून किंवा मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही व्यवस्था फक्त ऑटोरिक्षा चालकांच्या संपकाळासाठीच राहील,  असे प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी कळवले आहे. मुंबईत बेस्ट तसेच महापालिका वा नगरपालिकांच्या परिवहन उपक्रमांनानाही प्रवाशांना अधिक सेवा देण्याचे आदेश गृह खात्याचे सहसचिव भि. रा. वाढवे यांनी दिले आहेत.

Leave a Comment