नागपूर, दि. १५ – नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील ५ दिवसांच्या तान्हुल्याला पळविणार्या महिलेला अजनी पोलिसांनी अवघ्या २४ तासात अटक करुन लगेचच बाळाला त्याच्या मातेच्या स्वाधीन केले. बाळ ताब्यात मिळताच आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
शुक्रवारी सायंकाळी सुजाता प्रकाश गोंडाणे या महिलेने शशिकला जिभकाटे या महिलेचे ५ दिवसाचे बाळ पळवून नेले होते. या घटनेमुळे वैद्यकीय परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिस यंत्रणाही या घटनेमुळे हादरून गेली होती. १३ एप्रिल रोजी सायंकाळी शशिकला जिभकाटे रुग्णालयात एक्सरे काढण्याकरिता गेल्या होत्या. तेथे शशिकला त्यांच्या बाजूला व इतरही महिला बसल्या होत्या. शशिकलाला डॉक्टरांनी बोलावल्यानंतर तिने आपले बाळ बाजूला बसलेल्या सुजाता गोंडाणेच्या स्वाधीन केले आणि आतमध्ये एक्सरे काढण्यासाठी गेली. या दरम्यान ही सुजाता बाळाला घेवून पळून गेली. शशिकला बाहेर येवून पाहाते तर आपले बाळ दिलेली महिला गायब दिसली. त्यानंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. अजनी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून तक्रार नोंदवून घेतली आणि महिलेचा शोध सुरू केला. या दरम्यान शशिकलाने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी बाळाला चोरणार्या महिलेचे स्केच तयार केले. आणि स्केचच्या आधारे ऑटो रिक्षा स्टँडवर चौकशी सुरू केली. प्रवीण गोटे या ऑटो रिक्षा चालकाने आपण या महिलेला शांतीनगर येथे सोडल्याची माहिती दिली. पोलिस निरीक्षकांच्या नेतृत्त्वाखाली त्यांनी शांतीनगर गाठले. शांतीनगरमध्ये सुजाताचा तपास करून बाळाला ताब्यात घेतले. या प्रकरणी अजनी पोलिसांनी सुजाता विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सुजाताने हे बाळ कशासाठी चोरले याचा पोलिस शोध घेत आहेत.