नागपूर, दि. १५ – गडचिरोली जिल्ह्यात आजपर्यंत नक्षलवादी सरकारी अधिकार्यांना कंत्राटदारांना व आदिवासींना ठार करत होते. आता मात्र त्यांनी आपला मोर्चा राजकीय पक्षाच्या नेतृत्वाकडे व कार्यकर्त्यांकडे वळविला आहे. या घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यात राजकीय पक्षाच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहे.
गेल्या जानेवारीत भादरागडला बहादूरशाह आलाम यांची हत्या झाली तेव्हा सारे हळहळले. आता एकापल्लीत सामान्य जनतेत लोकप्रिय असलेल्या केवल सावकार यांचीही निर्घृण हत्या करण्यात आली. आताही सारे हळहळतील आणि थांबतील. या लोकशाहीत सर्व शक्तीमान सरकार नावाची यंत्रणाही या हळहळीवरच थांबली आहे. या शक्तीप्रदान करणार्या यंत्रणेला हतबल करून टाकण्याचा विडा नक्षलवाद्यांनी उचलला आहे व त्यात ते दिवसागणिक यशस्वी होत आहेत. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटीलच कशाला, खुद्द चिदंबरम यांनी जरी गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारले तरी काही फरक पडणार नाही, अशीच सध्याची स्थिती आहे. हा सारा दोष दिशा व संवेदना हरवलेल्या शासकय यंत्रणेचा आहे. सामान्य जनतेत लोकप्रिय होता येईल, असा कोणताही लोककल्याणाचा कार्यक्रम नक्षलवाद्यांजवळ नाही. अशा स्थितीत चळवळीच्या प्रभावक्षेत्रात शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवून कुणी लोकप्रिय होत असेल तर ते नक्षलवाद्यांना चालत नाही.
पोलिसांनी आयोजित केलेली आरोग्य शिबीर असो वा महसुली यंत्रणेचा कोणता कार्यक्रम असो, अशा प्रत्येक ठिकाणी आतंकवाद सक्रीयपणे सुरु आहे. स्वखर्चाने दुर्गम भागात वाहने पाठवून आदिवासींना अशा कार्यक्रमासाठी गोळा करायचे. ही सक्रीय एखाद्या दिवशी जीवावर बेतेल, याची जाणीव त्यांनाही होती, पण अंगात भिनलेले राजकारण व समाजकारण त्यांना स्वस्थ बसू देत नसे. ही सक्रीय आपल्याला लोकप्रियतेकडे नेत आहे, याची जाणीव आतंकवाद्यांना नव्हती, पण त्यांच्यावर नजर ठेवलेल्या नक्षलवाद्यांना होती. बंदुकीच्या बळावर लोकशाहीचा पाया उखडून टाकण्याचा अजेंडा हाती घेतलेल्या नक्षलवाद्यांना आता सामान्य जनता, राजकारणी व शासन यांच्यात असलेली समन्वयाची साखळीच तोडून टाकायची आहे. यासाठी त्यांनी आधी जनतेला लक्ष्य केले. शेकडो लोक ठार मारले. आता राजकारण्यांना टिपणे सुरू केले आहे. राजकारण करा, निवडणुका लढवा, पण आम्ही म्हणू तसेच वागा, आजच्या विचारांचा पुरस्कार करा, ते जमत नसेल तर गप्प बसा, असेच या चळवळीचे धोरण आहे.