पणजी, दि. १४ – गोवा पोलिस खात्यातील उपअधीक्षक शांबा सावंत यांना एका महिला कॉन्स्टेबलच्या कथित लैंगिक छळप्रकरणी दक्षता खात्याने नुकतेच निलंबित केले. सावंत हे यापूर्वीचे गृहमंत्री रवी नाईक यांच्या विश्वासातले म्हणून ओळखले जात होते. गोवा पोलिसातील एक वादग्रस्त अधिकारी अशीही त्यांची ओळख आहे.
सावंत क्राईम ब्रांचचे उपअधीक्षक असताना काही महिन्यांपूर्वी त्याच विभागाच्या एका महिला कॉन्स्टेबलने सावंत यांच्याविरूध्द लैंगिक छळाची तक्रार केली होती. उपअधीक्षक सावंत आपणास अश्लिल एसएमएस पाठवतात, त्यांच्यासोबत येण्यासाठी आग्रह करतात तसेच डोक्यावर चापट्याही मारतात असे पोलिस प्रमुखांकडे केलेल्या लिखित तक्रारीत तिने म्हटले होते.
यापूर्वीच्या सरकारने सावंत विरूध्दच्या या तक्रारीची फारशी दखल घेतली नव्हती. परंतु मध्यंतरी पोलिस खात्याच्या एका समितीने या प्रकरणाची चौकशी करून सावंत यांना दोषी ठरविले होते व सावंत यांच्या वर्तनाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली होती. या एकंदर प्रकाराची गंभीर दखल घेऊन अखेर दक्षता खात्याने त्यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला.