केंद्रांतील मंत्र्यांचे पाकसमोर लोटांगण – डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय अधिवेशनास प्रारंभ

पुणे, दि. १४ – विदेशी बँकांमध्ये असलेल्या भारतीय धनिक मंडळींच्या काळ्या पैशाबाबत पाकला संपूर्ण माहीती आहे. ही नावे उघड होण्याच्या भीतीमुळेच केंद्रातील मंत्री पाकसमोर लोटांगण घालत आहेत, अशी टीका जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी शुक्रवारी येथे केली. या ब्लॅकमेलिंगमुळेच अफजल गुरू आणि कसाब यांना फाशी होत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
    न्यू इंग्लीश स्कूल येथे पार पडलेल्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत स्वामी बोलत होते. यावेळी ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ पोफळी, कार्याध्यक्ष सूर्यकांत पाठक, प्रांताध्यक्ष प्रा. दिलीप फडके, राष्ट्रीय संघटक श्रीकांत जोशी, राष्ट्रीय सचिव अरूण देशपांडे आणि राष्ट्रीय महामंत्री सोमनाथ खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
    डॉ. स्वामी म्हणाले, विदेशी बँकांमध्ये काळा पैसा लपविलेल्या भारतीयांची नावे पाकला माहीत आहेत. या यादीत केंद्रातील निम्म्या मंत्र्यांची देखील नावे आहेत. पाककडून ही नावे उघड होण्याच्या भीतीने हे मंत्री त्यांच्यासमोर लोटांगण घालत आहेत. संयुक्त पुरोगामी आघाडीतील मंत्री ब्लॅकमेल होत असून याच कारणास्तव अफजल गुरू आणि कसाब यांना फाशी दिली जात नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला.
    भारत प्राचीन काळापासून कृषी क्षेत्रात अग्रेसर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी भारताचे कृषी क्षेत्रातील वर्चस्व मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यातच पंडित नेहरू यांनी या क्षेत्रासाठी आणलेल्या सोव्हिएट धार्जिण्या धोरणांमुळेच कृषी क्षेत्राचा कणाच मोडला. त्यानंतर आलेल्या हरितक्रांतीमुळे या क्षेत्राला थोडाफार दिलासा मिळाला. स्वतःच्या कृषी क्षेत्राच्या प्रचंड ताकदीविषयी भारत अनभिज्ञ असून या भागाचा केवळ २५ टक्केच वापर केला जात आहे. आज आपले प्रती हेक्टरी उत्पादन कमी आहे.
    दुधाच्या निर्यातीबाबत तर भारत विचारच करत नाही. त्यामुळे कृषी क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, अशा भावना डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी यावेळी व्यक्त केल्या.