यंदा ८० हजार टन आंब्याची निर्यात होणार

मुंबई, दि. ११ – आंबा उत्पादनात अग्रेसर असलेल्या भारतात २०१२-१३ च्या हंगामामध्ये ८० हजार टन आंब्याची निर्यात होणार असल्याचे कृर्षामाल निर्यातक संघटना ‘अपेडा’ ने म्हटले आहे. गेल्या वर्षी देशातून ४६ हजार ५०० टन आंब्यांची निर्यात करण्यात आली होती.
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गुजरात, पश्‍चिम बंगाल या राज्यांमध्ये आंब्यांचे मोठे उत्पादन घेतले जाते. मात्र, हवामानाच्या लहरीपणाचा आंब्यांच्या उत्पादनाला फटका बसत असल्याने निर्यातीवरही परिणाम होत आहे. चांगल्या प्रतीचा आंबा हा हवामानावर अवलंबून असतो. हवामानाने साथ दिल्यास यंदा आंब्याची निर्यात ८० हजार टनांवर जाईल, असा आशावाद ‘अपेडा’तर्फे व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशात सरासरी १५ लाख टन आंब्यांचे उत्पादन घेतले जात आहे. दरवर्षी मार्चच्या तिसर्‍या आठवडयापासून सुरु झालेली आंब्यांची निर्यात मे महिन्याच्या अखेरीपर्यंत केली जाते. 
महाराष्ट्रातील म्हणजेच कोकणातील हापूस आंबा व गुजरातमधील केसर आंब्याची विक्रेत्यांकडून निर्यात करण्यात येत असल्याचे ‘अपेडा’ने म्हटले आहे. राज्यात कोकणामध्ये हापूस उत्पादन घेतले जात असून हापूसला अनेक देशांमधून मोठी मागणी आहे. 

Leave a Comment