प्राध्यापकांच्या योग्य मागण्यांना पाठिंबा पण विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये – अ.भा.वि.प.

मुंबई, दि.१३ – `एम-फुक्टो’ या प्राध्यापक संघटनेने संपूर्ण राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे. प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका न तपासण्याचा निर्णय या संघटनेने जाहीर केला आहे. पण प्राध्यापकांच्या या निर्णयामुळे परीक्षांचे निकाल लांबणीवर पडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशमंत्री राजू चौहान यांनी शुक्रवारी केले.
    सरकार व प्राध्यापकांच्या संघर्षात विद्यार्थ्यांना वेठीस धरणे चुकीचे आहे. त्यामुळे प्राध्यापकांनी पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे घेऊन अन्य मार्गाने हे आंदोलन सुरु ठेवावे. मोर्चा, मंत्र्यांची गाडी अडविणे किंवा आमरण उपोषण अशा मार्गांनी सुद्धा हे आंदोलन सुरू ठेवता येऊ शकेल, असा खोचक सल्ला अभाविपने प्राध्यापकांना दिला आहे. बहुतांश महाविद्यालये व संस्था आमदार व मंत्र्यांच्याच ताब्यात असून, त्यांच्यावरही आपल्या मागण्यांकरिता दबाव टाकता येऊ शकतो. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा प्रभावी पर्याय सुध्दा खुला आहे, असे सांगतानाच अ.भा.वि.प. प्राध्यापकांच्या बाजूने आंदोलन करील, अशी ग्वाहीही चौहान यांनी दिली.
    अनेक विद्यापीठांचे निकाल उशीरा लागतात त्यांची जबाबदारी कोणीच घेत नाही. आपण शिकवत असलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत जाहीर होणे, हे आपले कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास संबंधित घटकांना अ.भा.वि.प. च्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशाराही राजू चौहान यांनी दिला आहे.