पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी अशासकीय विधेयक विधानसभेत सादर

मुंबई, दि. १३ – पत्रकारांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी राज्य शासनाने आत्तापर्यंत स्वतंत्र कायदा करण्याचे आश्‍वासन अनेकदा दिले आहे. परंतु वेळखाऊपणाचे धोरण अवलंबिल्यामुळे अखेर भाजपाचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी शुक्रवारी विधानसभेत पत्रकारांवरील हल्ले रोखण्यास उपयुक्त ठरणारे अशासकीय विधेयक सादर केले.
    विधानसभा विधेयक क्र. १२ – महाराष्ट्र प्रसारमाध्यमे सेवा-व्यक्ती आणि प्रसारमाध्यमे, सेवा संस्था (हिंसक कृत्ये आणि मालमत्तेची हानी यांना प्रतिबंध) विधेयक २०१२ असे या विधेयकाचे नाव असून, प्रसारमाध्यमात कार्यरत व्यक्तीवर हल्ला केल्यास ३ वर्षे तुरूंगवास आणि ५० हजार रूपये दंड, तर पत्रकारिता संस्थेच्या मालमत्तेची हानी केल्यास, नुकसानीच्या दुप्पट रकमेची भरपाई दोषींनी करावी, अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.
    गेल्या दशकभरात पत्रकारांवरील हल्ल्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. राज्यातील सर्व पत्रकार संघांनी या हल्ल्यांविरोधात कठोर कायदे कऱण्याची मागणी केली आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे स्थान अबाधित राखण्याकरिता अशा कायद्याची गरज असल्यामुळेच हे विधेयक मांडल्याचे हाळवणकर यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment