मुंबईला ३.४ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का दादर, माहिम, ऑपेरा हाऊस परिसर हादला

मुंबई, दि. ११ – इंडोनेशिया, सुमात्रा येथे आज दुपारी २ वाजून ८ मिनिटांनी ८.५ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाच्या धक्क्याने भारतातील चेन्नई, कोलकाता, तामीळनाडू, आसाम, बंगलोर शहर हादरले. तसेच अरबी समुद्रात १५५ कि. मी. अंतरावर ३.४ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाल्याने मुंबईही हादरली.
    या भूकंपामुळे माहीम, दादर, ऑपेरा हाऊस परिसरातील नागरिकांना भूकंपाचे झटके बसल्याने मुंबईकर भयभीत झाले. मात्र, मुंबईला कोणत्याही प्रकारचा धोका नाही, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. मुंबईला धोका नाही, जनतेने घाबरुन जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. इंडोनेशिया, सुमात्रामधील भूकंपाची व त्यानंतर भारतातील भूकंपाची ‘ब्रेकिंग न्यूज’ वाहिन्यांवर झळकली. त्यामुळे भूकपांचे धक्के विधीमंडळात, आमदारांनाही बसले. भूकंपाच्या बातमीने पालिका आपत्कालीन नियंत्रण कक्ष, मंत्रालय आपत्ती व्यवस्थापन कामाला लागले. सर्वत्र दूरध्वनी खणखणू लागले. मुंबईला भूकंपामुळे काहीच धोका निर्माण झालेला नाही. मुंबई भूकंप प्रवण क्षेत्र – ३ मध्ये येते. मुंबईत भूकंप झालाच तर पालिका, मंत्रालय, सरकारी यंत्रणा सजग आहे. आपत्कालीन आराखडा यापूर्वीच तयार करण्यात आला आहे.
अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन सर्वच यंत्रणा तात्काळ बचावकार्यास सिध्द आहेत अशी माहिती मुंबई महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख महेश नार्वेकर यांनी दिली.

Leave a Comment