वेदातील विचार अंमलात आणून आचरण करा

नागपूर, दि.११ – वेदांतील विचार हे भारतीय परंपरेतील सर्वश्रेष्ठ विचार असून त्यातूनच आपण परमानंदापर्यंत पोहोचतो. त्यामुळे प्रत्येकाने वेदातील विचार अंमलात आणून त्या पद्धतीने आचरण केले पाहिजे, असे प्रतिपादन आचार्य गुरुदेव गिरी महाराज यांनी केले.
डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांनी सुरेश्‍वराचार्यांच्या नैष्कमर्य भावसिद्धी या ग्रंथाचे मराठीत भाषांतर केलेल्या नैष्कर्म्यसिद्धी भावदर्शन या पुस्तकाचे प्रकाशन आचार्य गुरुदेव गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला मंदा गंधे, डॉ. श्रीकृष्ण देशमुख, मोहन वैद्य उपस्थित होते.
कर्मकांडाने ऐहिक सुखे एका मर्यादेपर्यंत प्राप्त होतात, पण ती नश्‍वर असतात. शाश्‍वत असे आत्मसुख मात्र आत्मज्ञानाने प्राप्त होते. वेदांताचा अभ्यास हाच सुखाचा मार्ग आहे. वेदांमधील मूळ तत्वज्ञानापेक्षा कर्मकांडाला एकेकाळी जास्त महत्व प्राप्त झाले होते. मूळ विचार व राष्ट्र भोवर्‍यात सापडले आहे. अशा वेळेस आद्य शंकराचार्यांनी भ्रांतों दूर केली, असे सांगून गुरुदेव गिरी महाराजांनी नैष्कर्म्यसिद्धी या शब्दावर भाष्य करताना स्वामीजींनी लौकिक कर्म व अलौकिक कर्म यातील भेद स्पष्ट केला.