लूपनेही गाशा गुंडाळला; कर्मचारी वा-यावर

नवी दिल्ली, दि. ११ – सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाने २ जीचे परवाने रद्द झाल्यामुळे भारतातून आपला गाशा गुंडाळण्याचा निर्णय लूप दूरसंचार कंपनीने घेतला आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील एतिसलात कंपनीनंतर लूप दूरसंचार ही भारतातून पाय काढणारी दुसरी बहुराष्ट्रीय कंपनी ठरली आहे.
परवाना रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आपल्यासमोर कोणताच पर्याय न राहिल्याने मुंबईसहित संपूर्ण भारतातील आपला व्यवसाय बंद करणार असल्याचे लूप कंपनीने जाहीर केले आहे. परिणामी आपल्या ग्राहकांनी मोबाईल पोर्टेबिलीटीचा वापर करून आपला नंबर न बदलता अन्य कोणत्याही कंपनीची सेवा स्वीकारावी असा सल्लाही कंपनीने दिला आहे. असे असले तरी मुंबईमधील आपली मोबाईल सेवा अबाधित राखण्यासाठी कंपनीची धडपड आहे. दरम्यान, कंपनीतील सुमारे दीडशे कर्मचा-यांना कामावरून कमी करण्याबाबतच्या नोटीसाही पाठविण्यास सुरूवात झाली आहे.
लूप दूरसंचार कंपनीला भारतात २१ विभागात सेवा देण्याचे परवाने होते. मात्र २ जी चा परवाना मिळविल्यानंतरही कंपनी आपला विस्तार करू शकली नाही. सध्या या कंपनीची सेवा केवळ १३ विभागांतच सुरू होती. फेब्रुवारीमध्ये जाहीर झालेल्या अहवालानुसार लूप दूरसंचार कंपनीचे सर्वांत अधिक २३०० ग्राहक कोलकाता येथे तर ओरिसामध्ये ९६५ ग्राहक आहेत.

Leave a Comment