पुणे, दि. ११ – सातार्यातील माणदेशी महिला बँकेने अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिटंन यांच्या क्लिटंन ग्लोबल इनिशिएटिव्ह या संस्थेशी सहकार्य करार केला असून त्या अंतर्गत या बॅकेंतील सदतीस हजार महिला सदस्यांना त्यांच्या व्यवसायवृद्धीसाठी तसेच व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे या बँकेच्या संस्थापक अध्यक्ष चेतना सिंहा यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. माणदेश हा सध्या तरी दुष्काळाच्या समस्यांचा सामना करणारा भाग आहे, पण तेथेच असा विकासाचा विषय पुढे आला आहे.
चेतना सिंहा यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या सबलीकरणासाठी माणदेशी महिला बँकेची स्थापना कांही वर्षांपूर्वी केली असून या बँकेतील सुमारे सदतीस हजार महिला खातेदार छोट्या मोठ्या व्यवसायांशी संबंधित आहेत. या सार्या सदस्यांना क्लिटंन ग्लोबल इनिशिएटिव्हतर्फे कायदा सल्ला, तंत्रविषयक सल्ला तसेच भागभांडवल उभारणी संबंधीचे मार्गदर्शन तज्ञ करणार आहेत. या प्रशिक्षणाच्या पहिल्या वर्षात सदतीस हजार सदस्यांपैकी किमान १ टक्का महिलांनी तरी व्यवसाय वाढीचे प्राथमिक पॅरामीटर आत्मसात करावेत अशी अपेक्षा आहे.
चेतना सिंहा यावेळी म्हणाल्या की, क्लिटंन इनिशिएटिव्हशी सहकार्य करार करण्यामागे आमच्या माणदेशी महिला सदस्यांना जागतिक उद्योगांचा परिचय व्हावा, मार्केटिंगची कौशल्ये समजावीत, तंत्रसल्ला मिळावा असा उद्देश आहे. त्यासाठी माणदेशी चेंबर ऑफ कॉमर्स फॉर रूरल वुमेन्स इन इंडियाची स्थापना करण्यात आली असून हा या सहकार्याचाच एक भाग आहे. चेंबरतर्फे सदस्यांना कायदा सल्ला, तंत्रसल्ला, उत्पादन वाढीचे मार्ग, उत्पादन खर्चात कपात कशी करावी, याचे मार्गदर्शन आणि सेवा क्षेत्रासंबंधी माहिती दिली जाणार आहे. १३ एप्रिलला या चेंबरचे म्हसवड मुख्यालयात उद्घाटन करण्यात येत आहे.
ग्रामीण महिलांना प्रोफेशनल स्किल्स शिकविण्यासाठी एचएसबीसीच्या सहकार्याने बिझिनेस स्कूल चालविले जात असल्याची माहिती बँकेच्या एक्झिक्युटिव्ह ऑफिसर रेखा कुलकर्णी यांनी दिली. हे कार्यक्रम राबविताना अनुदान अपुरे पडणे ही नेहमीचीच अडचण असल्याचे सांगून त्या म्हणाल्या त्यासाठीच किलंटन इनिशिएटिव्ह बरोबर सहकार्य करार करण्यात आला आहे. आमच्या या उपक्रमाची सुरूवात कांही वर्षांपूर्वी झाली असून महिला सबलीकरणाच्या उद्देशाने ही बँक काम करते आहे. व्यवसाय करू इच्छीणार्या महिलांना बॅकेतर्फे कर्जपुरवठा केला जातो. त्यातून महिलांना पारंपारिक अन्नपदार्थ उत्पादित करणे, मसाले लोणची तयार करणे, शिवणकला, पेपर कप बनविणे असे उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. गेल्या कांही वर्षात आमची उलाढाल कोट्यावधी रूपयांच्या घरात गेली असली तरी व्यवसाय कौशल्यात आम्ही कमी पडतो याची जाणीवही आम्हाला झाली आहे आणि ती त्रुटी भरून काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
