भारत-पाक संबंधांमध्ये होणारी सुधारणा प्रशंसनीय – अमेरिका

वॉशिग्टन, दि. १० – पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षांच्या भारत दौर्‍यानंतर दोन्ही शेजारी राष्ट्रांदरम्यान पुन्हा सुरू झालेल्या ‘मैत्रीपर्वा‘बाबत अमेरिकेने समाधान व्यक्त केले आहे. झरदारी यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची भेट घेऊन, त्यांना पाक दौर्‍यावर येण्याचे दिलेले निमंत्रण देणे प्रशंसनीय असल्याचे त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष असीफ अली झरदारी नुकतेच राजस्थानातील सुप्रसिद्ध अजमेर दर्ग्याच्या दर्शनाकरिता भारताच्या दौर्‍यावर आले होते. त्यांच्या या खाजगी दौर्‍यातून पुन्हा एकदा मैत्रीचे धागे गुंफण्याच्या पंतप्रधान डॉ. सिंह यांच्या प्रयत्नांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्यासोबत भारत-पाक संबंधांवर औपचारीक चर्चा केली. इतकेच नव्हे तर या दोन्ही देशांतील वादग्रस्त मुद्यांवर विस्तृत चर्चा करण्यासाठी झरदारी यांनी डॉ. मनमोहन सिंह यांना पाकिस्तानच्या दौर्‍यावर येण्याचे निमंत्रण दिले.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या व्हिक्टोरिया नलँड यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना भारत-पाक दरम्यानच्या संबंधांमध्ये अधिक सुधारणा होण्याची आशा व्यक्त केली. या दोन्ही देशांमध्ये राहणार्‍या कोट्यावधी नागरिकांना शांत आणि मैत्रीपूर्ण जीवन अनुभवण्याची संधी येत्या काळात प्राप्त होईल, असे नलँड यांनी सांगितले.

Leave a Comment