
अक्कलकोट, दि. १० – महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. संत विचारावर महाराष्ट्राची समृध्दी आहे, असे बोधपर विचार ह.भ.प. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.
दत्तअवतार श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १३४ व्या पुण्यतिथी निमित्ताने अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये धर्मसंकीर्तन महोत्सवातील दुसरे पुष्प गुंफताना ह.भ.प. रामचंद्र देखणे बोलत होते.
महाराष्ट्रातील संताची महती सांगताना ह.भ.प. देखणे यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज भक्तीचे, नाथ महाराज शांतीचे, रामदास स्वामी क्रांतीचे व संत ज्ञानेश्वर हे ज्ञानाचे प्रतीक असल्याचे सांगितले. ज्ञानाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज. ज्ञान हे सेवेवर आधारलेले साधन आहे. विद्या ही सेवाप्रणव असावी. पूर्वी विद्यार्थी आश्रमात सेवा करुन जगत असत. आज मात्र प्रत्येक विद्यार्थी आई वडिलांच्या अर्थाजनावर शिक्षण घेतो. आपल्याकडे अभिमानाची परंपरा आहे. पण परंपरेचा अभिमान असणे आवश्यक आहे, असे विचार ह.भ.प. रामचंद्र देखणे यांनी प्रवचनसेवेत व्यक्त केले.