जनता सहकारीला आता मल्टीस्टेट बँकेचा दर्जा

पुणे, दि.१०  पुणे जनता सहकारी बँकेत गुजराथेतील ब्रह्मखेडा सहकारी बँक विलीन झाली असून त्यामुळे जनता सहकारी बँकेस ‘मल्टीस्टेट बँकेचा दर्जा’ प्राप्त झाला आहे. लवकरच गोवा व कर्नाटक राज्यातही जनता बँकेच्या शाखा उघडण्यात येणार आहेत, बँकेची उलाढाल आता सहा हजार आठशे कोटीच्या घरात गेली असून या बँकेचा समावेश देशातील पहिल्या मोठ्या अग्रगण्य सहकारी बँकेत झाला आहे, असे बँकेचे कार्याध्यक्ष अरविंद खळदकर व उपकार्याध्यक्ष संजय लेले यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले, गेल्या चौदा वर्षाच्या कसोटी काळात बँकेने चांगली प्रगती केली आहे. मार्च १२ अखेर बँकेचे भाग भांडवल ८३ कोटी झाले असून सभासद संख्या एक लाख चौतीस हजार झाली आहे. बँकेचे अनुत्पादित कर्जाचे प्रमाण अर्ध्याटक्क्यापेक्षा कमी आहे.  
संगणक व इंटरनेट क्षेत्रातील सर्व सुविधा बँकेला उपलब्ध आहेत. विदेशी विनियमाच्या व्यवहाराची सोयही आता बँकेत झाली आहे. देशातील कोणत्याही बँकेच्या एटीएममधून या बँकेचा व्यवहार होऊ शकतो. लवकरच इंटरनेट बँकिग, मोबाईल बँकिग, डेबिट कार्ड या सुविधा उपलब्ध होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment