अण्णा करत आहेत पुन्हा बुलंद आवाज

पुणे दि.९- यंदाच्या मे महिन्यात राज्यातील ३५ जिल्ह्यात आंदोलनाची रणधुमाळी उडवून देण्याचा निर्णय अण्णा हजारे व त्यांच्या महाराष्ट्र टीमने घेतला असल्याचे वृत्त आहे. कॅगचा रिपोर्ट, पुण्यातील पाणी चोरी, आदर्श सोसायटी, आशिर्वाद सोसायटी आणि दुष्काळातील भ्रष्टाचार या पार्श्वभूमीवर हे आंदोलन होणार असल्याने राज्यातील बहुतेक वरीष्ठ नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे. यापूर्वी महाराष्ट्रात अण्णांनी सुरु केलेल्या आंदोलनाने प्रचंड गर्दी आकर्षिली नव्हती पण परिणाम मात्र प्रचंड झाला होता. पण गेल्या वर्षी अण्णांचे आंदोलन दिल्लीत झाल्यानंतर प्रचंड गर्दी म्हणजे चांगला प्रतिसाद असे एक नवे समीकरण जन्मास आले व सहा महिन्यापूर्वी अण्णानी मुंबईत केलेल्या उपोषणास गर्दीचा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे अण्णांचे आंदोलन फसले असा निष्कर्ष काढण्यात आला या पार्श्वभूमीवर अण्णा आणि अण्णा टीम पुन्हा आंदोलन करत आहेत.  अण्णांचे आंदोलन राष्ट्रपातळीवर गेल्यामुळे राज्यात निवांत असलेले सत्ताधारी नेते पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. महागाई , पाणीटंचाई सारख्या समस्यांनी ग्रासलेल्या या नेत्यांना बजेट अधिवेशनानंतर अण्णांच्या आंदोलनाचाही सामना करावा लागणार अशी चिन्हे दिसत आहेत.
  अण्णा सांगतात, आमच्या आंदोलनाच्या रेट्यामुळेच महाराष्ट्रात प्रथम माहिती अधिकार कायदा अस्तित्त्वात आला व नंतर तो केंद्रात आला. आता प्रभावी लोकपाल कायदा हे आमचे ध्येय असून आम्ही त्या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना धारेवर धरणार आहोत. आमच्या या आंदोलनात राज्यातील तरूणाईला सहभागी करून घेण्यासाठी जनजागृती हाती घेण्यात आली आहे. या मोठ्या आंदोलनाचा संकल्प करतानाच आम्ही या जनजागृतीत एक गांव दत्तक घ्या आणि त्याचा विकास करा असे आवाहनही करत आहोत. अण्णा मे महिन्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील जिल्ह्यात आंदोलनाचे रणशिंग फुंकणार आहेत.-

Leave a Comment