गुप्तचर यंत्रणांचा वापर राजकीय फायद्यासाठी- अॅड. प्रशांतभूषण

पुणे, दि. ९ – गुप्तचर यंत्रणांचा वापर सरकार राजकीय फायद्यासाठी करीत आहे, असा आरोप टीम अण्णांमधील सदस्य अॅड. प्रशांतभूषण यांनी शनिवारी पुण्यात केला. इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे वेस्ट स्टडी सर्कलतर्फे अॅड. भूषण यांचे ‘कायद्यांच्या रचनेत नागरिक व व्यावसायिकांची भूमिका’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
  अॅड. भूषण म्हणाले, लष्करासंबंधीच्या बातम्यांमध्ये गुप्तचर यंत्रणाही सहभागी असण्याची शक्यता आहे. गुप्तचर यंत्रणांचा वापर सरकार राजकीय फायद्यासाठी करीत आहे. लष्कराच्या हालचालींबाबत प्रसिध्द झालेल्या बातम्यांमागे याच यंत्रणेचा हात असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली. ज्यावर करोडो रुपये खर्च होतात, अशी यंत्रणा सरकारने कमकुवत केली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
  जनलोकपाल बिल तसेच खितपत पडून देण्याचा सरकार आणि विरोधी पक्षांच्या डाव आहे. पण आम्ही त्यांना तसे करु देणार नाही. त्यांना वाटत आहे, आमचे आंदोलन आता थंड पडू लागले आहे. परंतु ते मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत. आमच्या आंदोलनाने जोर धरला असून  आमचा हेतू फक्त जनलोकपाल बिल आणायचा नसून आपल्या लोकतंत्रात परिवर्तन घडवून आणून ते मजबूत करण्याचा आहे.

Leave a Comment