सलीम अली

भारतातील आद्य पक्षी तज्ञ म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, ते महान व्यक्तिमत्त्व म्हणजे सलीम मोईनुद्दीन अली, अर्थात सलीम अली. 

सलीम अली यांचा जन्म १२ नोव्हेंबर १८९६ साली मुंबईतील एका बोहरी कुटुंबात झाला. मोइझुद्दीन आणि झिनत-उन्-निस्सा या दांपत्याचे ते नववे अपत्य. दुद:वाने अलींना माता-पित्याचा सहवास अत्यल्प लाभला. अली एक वर्षाचे असताना त्यांचे वडील, तर ते अवघे तीन वर्षांचे असताना त्यांच्या मातोश्री पैगंबरवासी झाल्या. मुंबईच्या खेतवाडीत राहणारे त्यांचे निपुत्रिक मामा-मामी (अमिरूद्दीन त्याबजीं आणि हमिदा बेगम) यांनी त्यांचा सांभाळ केला. 

लहान वयात बक्षीस मिळालेल्या छर्‍याच्या बंदुकीने पक्षी टिपण्याचा छंद त्यांना लागला. एकदा त्यांनी टिपलेल्या चिमणीच्या गळ्यापाशी त्यांना पिवळा ठिपका आढळला. नेहमीच्या चिमणीपेक्षा ही चिमणी काहीतरी वेगळी भासल्याने त्यांची उत्सुकता चाळवली गेली. त्यांनी आपल्या मामाकडे या वेगळ्या चिमणीबद्दल विचारणा केली. मामांनी त्यांना सरळ `बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’ (बीएनएचएस)च्या संचालकाकडे नेले. त्या संचालकाने या पक्ष्याबद्दल सविस्तर माहिती दिली. तेथील भुशाने भरलेल्या पक्षांचा संग्रह त्यांना दाखविला. भारावलेल्या नजरेने लहान अली ते सगळे न्याहाळत होता. तेथूनच अली यांना पक्षांबद्दल आवड निर्माण झाली, ती त्यांनी जोपासली, वृद्धिंगत केली आणि जगालाही अर्पण केली.

पुढील काही काळ अलींच्या पक्षी निरीक्षणाला फारसा वेग प्राप्त होत नव्हता. प्राणी शास्त्रात पदवी संपादन करावी असे त्यांना वाटले, पण शास्त्र शाखेतील इतर अवघड विषयांमुळे त्यांनी माघार घेतली. 

पुढे त्यांच्या देशातील त्यांच्या बंधूंच्या व्यापारात मदत करण्यासाठी अली तेथे गेले. तेथे त्यांनी जंगलात हिंडून पक्षांना टिपून त्यांच्या नोंदी ठेवण्याचा छंद हळूहळू चालू ठेवला. तेथेच १९१८ साली त्यांचा तेहमिना यांच्याशी विवाह झाला. नवर्‍याचा हा अनोखा छंद तेहमिनाच्या लक्षात आला होता. तिने आपल्या नवर्‍याला यासाठी खूप प्रोत्साहन दिले. त्यामुळे अलींच्या पक्षिनिरीक्षणाला वेग प्राप्त झाला. १९२४ साली ते भारतात परतले. 

मुंबईत परतल्यानंतर तेहमिनाने अली यांना अशीच नोकरी करण्याचा सल्ला दिला, जेथे त्यांच्या या छंदाला वाव मिळेल. पण अलींचे शिक्षण फारच जुजबी होते. बीएनएचएसमध्ये त्यांना गाइड लेक्चरर म्हणून नोकरी मिळाली. त्या काळात भारतात पक्षी शास्त्र (ऑर्निथॉलॉजी) हे विषय अस्तित्वातच नव्हता. मग त्यासाठी त्यांनी जर्मनीमध्ये जाऊन पक्षी शास्त्राचे शिक्षण घेतले. त्यानंतर काही काळ ते इंग्लंडमध्ये राहिले. 

त्यांनी घेतलेल्या शिक्षणाच्या जोरावर अलींना भारतात नोकरी मिळणे कठीणच होते. आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे त्यांनी आपला मुक्काम मुंबईहून अलिबागजवळील किहीम येथे हालविला. 

किहीम येथील वास्तव्यात त्यांना सुगरण पक्षाच्या वर्तनावर अतिशय बारकाईने नजर ठेवण्याची चांगली संधी प्राप्त झाली. सुगरण पक्षाच्या निरीक्षणावर आधारित एक शोध निबंध त्यांनी बीएनएचएसच्या जर्नलसाठी लिहिला. या शोधनिबंधामुळे जगाला खर्‍या अर्थाने `पक्षी तज्ञ सलीम अली’ यांची ओळख झाली. येथून त्यांची प्रगती सुरू झाली. 

पुढील काळांत पक्षांच्या जीवनशैलीवर अभ्यास करण्याचे कठीण काम त्यांनी हाती घेतले. ब्रिटिश काळात तत्कालीन सरकारने त्यांना तशी परवानगी दिली. त्यानंतर भारतातील अनेक ठिकाणी त्यांनी पक्षी निरीक्षणाच्या मोहिमा आखल्या. अगदी वायव्य सरहद्द प्रांतापासून ते केरळपर्यंतच्या जंगलांतून त्यांनी भटकंती केली. कच्च्छचे रण, पूर्वेकडील सिक्कीम-अरुणाचल प्रदेश आदी दूरदूरच्या प्रदेशांत जाऊन त्यांनी विविध पक्षांच्या जीवनशैलीचे निरीक्षण करून नोंदी घेतल्या. त्यांच्या कार्यात त्यांची पत्नी तेहमिना यांनी खूप मदत केली. त्या प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे काम बघत असत. मात्र अली यांना तेहमिना यांचा सहवास फार काळ लाभला नाही १९३९मध्ये तेहमिना यांचे दु:खद निधन झाले. अली यांना हा मृत्यू पचविणे अवघड गेले. त्यांच्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली. कालांतराने त्यातून ते सावरले, पण त्यांनी दुसरे लठ न करता स्वत:ला पक्षी निरीक्षणात संपूर्णपणे वाहून घेतले. 

आपले पक्षीपनरीक्षण केवळ जर्नल्समध्ये प्रसिद्ध न करता सर्वसामान्यांपर्यंत पोचण्यासाठी त्यांनी सहजसोप्या भाषेत अनेक पुस्तके लिहिली. १९४३ साली त्यांनी लिहिलेले `द बुक ऑफ इंडियन बर्डस्’ हे पुस्तक आजही पक्षी तज्ञांचे पहिल्या पसंतीचे पुस्तक आहे. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांपैकी `हँडबुक ऑफ इंडिया ऍण्ड पाकिस्तान` आणि `पिक्टोरियल गाइड’ (दहा खंड) या दोन पुस्तकांनी अली यांचे नाव अजरामर झाले. 

डॉ. सिडने हिलन रिप्ली या साथीने त्यांनी परिश्रमपूर्वक भारतीय पक्षांच्या १२०० जाती, २१०० उपजाती यांच्या नोंदी आणि त्यांच्या सवयी यांची शास्त्रशुद्ध माहिती नोंदवून ठेवली आहे.

पक्षी तज्ञाबरोबरच पर्यावरण हाही त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. १९५०-६० साली पर्यावरणाची हानी हा विषयसुद्धा अस्तित्वात नसताना भरतपूरच्या केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यानाला, तसेच केरळमधील सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानाला हानिकारक ठरणार्‍या प्रकल्पांना त्यांनी कडाडून विरोध केला होता. `ताजमहाल नष्ट झाला, तर परत बांधता येईल, पण सायलंट व्हॅलीसारखे जंगल नष्ट झाले तर परत उभारता येणे केवळ अशक्य आहे’ असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यांच्या विरोधामुळे तत्कालीन इंदिरा गांधींच्या काँग्रेस सरकारने हे प्रकल्प स्थगित केले. त्यांच्या पर्यावरण रक्षणाच्या कार्यामुळे त्यांचा आद्य पर्यावरणवाद्यांमध्येही समावेश होतो. 

त्यांच्या या अलौकिक कार्याबद्दल त्यांना जागतिक दर्जाचे अनेक मान-सन्मान प्राप्त झाले. १९५८ साली भारत सरकारने त्यांचा पद्मभूषण हा किताब देऊन सन्मान केला.

महाराष्ट्र सरकारने त्यांचा जन्मदिवस १२ नोव्हेंबर हा पक्षी दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. 

अनेक ध्येयवेडय़ा लोकांप्रमाणे अली यांनाही प्रदीर्घ आयुष्य लाभले. २७ जुलै १९८७ रोजी वयाच्या ९०व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. 

Leave a Comment