सराफांचा केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात मोर्चा

मुंबई, दि. २८ – सोन्याच्या दागिन्यांवर केंद्र सरकारने आकारलेल्या उत्पादन शुल्काला मुंबईतील प्रमुख सराफांनी विरोध दर्शविला आहे. मुंबई उपनगरीय सराफी संघटनेसह अन्य चार सराफ संघटनांनी केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या या तरतुदीचा निषेध करण्यासाठी मंगळवारी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात मेणबत्ती मोर्चा काढला.
  केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात यापुढे रोखीने होणार्‍या दागिने विक्रीवर १ टक्का कर आकारण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. सोने खरेदीवर सध्या लागू असलेला १ टक्का मूल्यवर्धित कर आणि ४ टक्के आयात शुल्काचा भार देखील वरील सुधारणेनंतर कायम राहणार असल्यामुळे दागिन्यांची किमत ५ ते ६ टक्क्यांनी वाढेल, अशी भीती पेंडुरकर ज्वेलर्सचे मालक अजित पेंडुरकर यांनी व्यक्त केली. तसेच नव्या आर्थिक वर्षापासून सोन्याच्या दागिन्यावर प्रत्येक १०० रूपयांमागे ३० पैसे उत्पादन शुल्क सुद्धा लागू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या या अदूरदर्शी धोरणामुळे दागिने विकत घेतल्यावर बिल न मागण्याची प्रवृत्ती वाढेल. सोन्याच्या आयातीवर शुल्क लागू केल्यामुळे सोन्याच्या तस्करीला देखील चालना मिळेल, असा इशारा पेंडुरकर यांनी यावेळी दिला.
  तर उत्पादनशुल्क विभागाचे अधिकारी सराफांच्या दारी येऊन, पुन्हा एकदा इन्सपेक्टर राज सुरू होईल, असे प्रतिपादन ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी फेडरेशनचे संस्थापक सदस्य आनंद म्हाप्रळकर यांनी केले.
  मुंबई उपनगरीय सराफी संघटना, परळ ज्वेलर्स असोसिएशन, एलफिस्टन ब्रिज ज्वेलर्स असोसिएशन, माटुंगा ज्वेलर्स असोसिएशन या संघटनांचे पदाधिकारी तसेच सदस्य सराफ शिवाजी पार्क जिमखान्याजवळ मंगळवारी सायंकाळी मेणबत्ती मोर्चासाठी जमले होते. शिवाजी पार्क जिमखान्यापासून शिवसेना भवन, प्लाझा सिनेमामार्गे, रानडे रोडवरील सेनापती बापट यांच्या पुतळ्याजवळ या मोर्चाची सांगता झाली. या मेणबत्ती मोर्चात केंद्र सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. यामध्ये वामन हरी पेठे ज्वेलर्सचे मालक आशिष पेठे, अजित पेंडुरकर, आनंद म्हापळकर, मधुसुदन पालशेतकर, महेश वैद्य आदी नामवंत सराफ सहभागी झाले होते.
  शिवाजी पार्क शिवाय ठाणे, डोंबिवली, वाशी, भिवंडी, भाईंदर, नवी मुंबई, कल्याण आदी शहरांमध्येही मेणबत्ती मोर्चा निघाल्याचे आनंद म्हाप्रळकर यांनी सांगितले. तसेच, देशात मेरठ, हिमाचल प्रदेश, छत्तीसगढ येथे रॅली काढण्यात आली. अंबाला येथे शहर सराफ असोसिएशनचे ८ सदस्य अन्नत्याग करून उपोषणाला बसले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी बोलताना दिली.

Leave a Comment