व्यापारी तोटा वाढला

    फेब्रुवारी महिन्यात आपल्या देशाचा व्यापारी तोटा वाढला आहे. तोटा वाढला आहे याचा अर्थ तोटा पूवींपासून होत होता त्याचे प्रमाण वाढले आहे. देशाचा व्यापारी तोटा काढण्याचा उपाय सोपा असतो. आयात आणि निर्यात यातील फरक म्हणजे व्यापारी नफा किंवा तोटा. आपली आवक जादा आणि निर्यात कमी असेल तर व्यापारी तोटा. निर्यात जादा आणि आयात कमी असली की व्यापारी नफा. कोणत्याही देशाची प्रगती या नफ्या- तोट्यावरून समजली जात असते. जो देश प्रगत असतो तो भरपूर निर्यात करीत असतो. त्या मानाने तो आयात कमी करतो. तेव्हा त्याला निर्यातीतून भरपूर परकीय चलन मिळते. त्या मानाने त्याला परदेशातून काहीतरी मागवण्यावर कमी खर्च करावा लागतो. त्यामुळे त्याच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत भरपूर शिल्लक पडते. पण स्थिती उलट असेल तर त्याची गंगाजळी आटायला लागते. भारताने फेब्रुवारी महिन्यात चार अब्ज डॉलर्सचा माल परदेशात पाठवला. पण १५ अब्ज डॉलर्सचा माल आयात केला. याचा अर्थ भारताला या महिन्यात अकरा अब्ज डॉलर्स एवढा व्यापारी तोटा झाला. ही स्थिती काही चांगली नाही. स्थिती नेमकी उलट व्हायला हवी. आयात कमी आणि निर्यात जास्त व्हायला हवी.
    फेब्रुवारी मध्ये निर्यातीत फार वाढ झाली नाही.  जानेवारी पेक्षा फेब्रुवारीत केवळ चार टक्के  जादा निर्यात झाली. गेले काही महिने ही वाढ कमी कमी होत आहे. गेल्या मे मध्ये निर्यात वाढ ८०टक्के होती पण ती फेब्रुवारीत केवळ चार टक्के  वाढली.त्यामानाने आयात मात्र भरपूर वाढली. आपण आयातीवर बरेच अवलंबून आहोत. आपल्याला लागणार्‍या इंधन तेलाच्या ७० टक्के तेल आयात करावे लागत आहे. त्यावर आपला परकीय चलनाचा साठा खर्च होत आहे तेव्हा ही आयात कमी करावी असे वाटते पण ती कमी होण्याच्या ऐवजी वाढत असते कारण भारतात वाहनांची संख्या वरचेवर वाढत आहे. त्याच्या पाठोपाठ आपला बराचसा पैसा कोळशावर खर्च होत असतो कारण, आपण वीज निर्मितीच्या बाबतीत कोळशावर अवलंबून आहोत आणि तेलाप्रमाणेच कोळशाच्या किंमतीही वाढत आहेत आणि त्यांचा आपल्या देशातला वापरही वाढत आहे. त्यामुळे आपली परकीय  चलनाची गंगाजळी या दोन गरजांमुळे आटत आहे. तेल आणि कोळसा या दोन गरजा अशा आहेत की ज्या कमी करता येत नाहीत. त्यांच्या आयातीवर होणारा खर्च अटळ आणि अपरिहार्य आहे.
    काही आयाती मात्र अनावश्यक आहेत. उदाहरणार्थ सोन्याची आवक. सोन्याची आवक केली नाही तर काही बिघडत नाही. ती कमी व्हावी यासाठी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सोन्याच्या आयातीवरचा कर वाढवला. तसे केल्याने तरी आयात कमी होईल आणि आपले परकीय चलन वाचेल, आपला व्यापारी तोटा कमी होईल असे अर्थ  मंत्र्यांचे म्हणणे होते. पण त्यांच्या निर्णयाने सोन्याच्या बाजारात खळबळ माजली आहे.  या करातून सरकारला जादा १०० कोटी रुपयांचे  उत्पन्न मिळणार आहे. तशी अपेक्षा आहे. ही रक्कम काही फार नाही. पण  आपल्याला प्रगती करायची असेल तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतील असे मुखर्जी यांचे मत आहे.  भारतीय लोक सोन्याचे फार वेडे आहेत. भारतात सोने खूप आहे पण या सोन्याचा आपल्या प्रगतीला काहीही उपयोग होत नाही.  आपल्या देशात दरसाल सोन्याची मागणी ९०० टनांवर असते पण त्यातले केवळ दोन टन सोने भारतात तयार होते. बाकीचे देशातच या हातातून त्या हातात जाते आणि ३० टक्के गरज आयातीतून भागवली जाते. आपल्या परकीय चलनाच्या गंगाजळीचा मोठा हिस्सा या अनुत्पादक वस्तूवर खर्च होत असतो. आपण पाण्यावर जेवढा पैसा खर्च करतो त्यापेक्षा जास्त पैसा सोन्याच्या आयातीवर खर्च करीत असतो.    
    चीन हाही देश सोन्याच्या आयातीत आघाडीवर आहे पण त्याचा क्रमांक भारताच्या नंतरच लागतो. भारताची सोन्याची आयात चीनपेक्षा ३७ टक्के  जास्त आहे. चीनचे उत्पन्न भारताच्या तिपटीपेक्षा जास्त असूनही भारताची सोन्याची आयात चीनपेक्षा जास्त आहे. अमेरिकेचे वट्ट राष्ट्रीय उत्पन्न भारताच्या दसपट आहे पण भारताची सोन्याची आयात अमेरिकेच्या पाचपटीने जास्त आहे. एकंदरीत सोन्यासारख्या अनुत्पादक वस्तूवर आपले परकीय चलन मोठ्या प्रमाणावर खर्च होत असते. त्याला आळा बसल्याशिवाय आपला आयात निर्यातीचा तोटा भरून निघणार नाही. ती आयात कमी करण्याचा एक उपाय म्हणून या आयातकर वाढीकडे पाहिले  पाहिजे. हा निव्वळ १०० कोटीचा प्रश्न नाही आपण आपल्या संग्रहातले  परदेशी चलन कसे खर्च करणार हा प्रश्न आहे. हे चलन अधिक उत्पादक कामांवर खर्च झाले पाहिजे. त्याच प्रमाणात आपली निर्यात वाढली पाहिजे पण तिच्याबाबतीत आपण निष्काळजी आहोत. आपण शेतीमाल भरपूर निर्यात करू शकतो.आपल्या देशातून चहा, हिरे, सॉफ्ट वेअर यांची मोठी निर्यात आहे. ती वाढून आयात कमी झाली पाहिजे.

Leave a Comment