’राजा परांजपे सन्मान‘ सई परांजपे यांना जाहीर

पुणे, दि. ९ – राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘राजा परांजपे सन्मान’ यंदा दिग्दर्शिका सई परांजपे यांना जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अर्चना राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याबरोबरच ‘राजा परांजपे तरुणाई सन्मान’ यंदा अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री तेजस्विनी पंडित, दिग्दर्शक निशिकांत कामत आणि लेखनासाठी गिरीश कुलकर्णी यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राणे म्हणाल्या, येत्या १४ ते २० एप्रिल दरम्यान राजा परांजपे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या दरम्यान या पुरस्कारांचे वितरण होईल. न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे हा महोत्सव पार पडेल. ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी राजा परांजपे तरुणाई सन्मानाचे वितरण करण्यात येईल. शुक्रवारी २० एप्रिल रोजी राजा परांजपे सन्मानाचे वितरण ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते होईल. मानपत्र आणि मानचिन्ह असे सन्मानाचे स्वरुप आहे. यावेळी सई परांजपे यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम होणार आहे.
  महोत्सवात राजा परांजपे यांच्या चित्रपटांसह कथ्थक व वाद्यवृंद फ्यूजन, हिंदी चित्रपटातील गाण्यांचा कार्यक्रम, नाट्यसंगीत अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. महोत्सवाच्या काळात युवा कलाकारांसाठी १५ ते १९ एप्रिल या कालावधीत शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Comment