महागाईचे अर्थशास्त्र

    महागाईचा बुलडोझर फिरायला लागला आहे. महागाईने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत की त्याचे वर्णन कसे करावे हेही कळेनासे झाले आहे. बाहेर उन्हाचा कहर आणि घरात महागाईचा कहर या स्थितीने सामान्य माणसाचे जगणे मुष्कील झाले आहे.  हे सारे खरे आहे पण या भाववाढीचा लाभ त्या वस्तू तयार करणार्‍या शेतकर्‍यांना होतो का ? याचा शोध घेतला तर  असे लक्षात येते की या महागाईत शेतकरीही कोरडाच आहे. शेतकरी गेले सहा महिने दोन रुपये किलो दराने कांदा विकत आले आहेत. तो व्यापार्‍यांनी टनांशी खरेदी केलाय. आता शेतकर्‍याजवळचा कांदा संपलाय. आता व्यापारी आपल्याकडचा कांदा २० रुपये दराने विकायला लागतील. कांदा महाग झाला म्हणून सामान्य ग्राहक आरडा ओरडा करायला लागेल. कांदा महाग झालाय म्हणजे शेतकरी मालामाल होतोय असा त्याचा समज होईल पण वास्तवात शेतकरी लुटला गेलाय आणि त्याच्या घामावर व्यापारी मालामाल होतोय. कांदा महाग झाल्यामुळे  ग्राहकांचीही लूटच होत आहे. मधल्या मध्ये दलालच मालामाल होत आहेत. शेतकर्‍यांचे हाल कायम आहेत.
    आपल्या देशात शेतीमालाच्या किंमतीची चर्चा करून सगळेच थकले आहेत. पण आपल्या बाजार व्यवस्थेने या प्रश्नावर तोडगा काढलेला नाही. भारतात शेतकरी वर्ग मोठा आहे. त्यामुळे शेती मालाच्या उत्पादकांना त्याच्या मालाचा न्याय्य दाम मिळाला नाही की, मोठा वर्ग  फसवला जातो आणि त्याचे मोठे गंभीर परिणाम सार्‍याच अर्थव्यवस्थेवर होतात. त्यामुळे शहरातल्या ग्राहकांनाही माफक किंमतीला हा माल मिळावा आणि त्याच वेळी उत्पादक शेतकर्‍यांनाही न्याय्य भाव मिळावा असा समतोल साधणारी व्यवस्था आपल्या सरकारला आणि समाजातल्या  अर्थतज्ञांना निर्माण करता आलेली नाही. शेतीमालाच्या किंमतींची चर्चा फिरून फिरून आपल्या देशातल्या गरीब लोकांपाशी थांबते. शेतकर्‍यांना शेतीमालाचा चांगला भाव मिळावा हे ठीक आहे पण शेतकर्‍यांना चांगला भाव मिळाला की जीवनावश्यक मालाच्या किंमती वाढतात आणि त्या  वाढल्या की शहरातल्या गरिबांचे हाल होतात. म्हणून शेती मालाच्या किंमती मर्यादितच राहिल्या पाहिजेत असे अनेकांचे मत असते. पण तसे ते राहिले की शेतकर्‍यांचा शेतीतला इंटरेस्ट कमी होतो आणि उत्पादन वाढत नाही. अशी आपल्या अर्थ व्यवस्थेची कडी झाली आहे. ती सुटू शकते पण इच्छाशक्तीचा अभाव आडवा येतो.
    भारतातल्या ग्राहकांची क्रयशक्ती कमी आहे म्हणून तो धान्य, भाज्या, फळे, मांस, अंडी, साखर, दाळी यांच्यासाठी फार पैसा खर्च करू शकत नाही. म्हणून शेतीमालाला चांगला भाव मिळत नाही असे अनेक वर्षांपासून सांगितले जात होते आणि आताही सांगितले जात आहे. पण आता तशी स्थिती राहिलेली नाही. भारतातल्या  दारिद्रय रेषेखालच्या लोकांची संख्या कमी झाली आहे. दरडोई उत्पन्नात गेल्या २० वर्षात तिप्पट वाढ झाली आहे. आता लोकांची क्रय शक्ती चांगली नाही म्हणून शेती मालाला भाव मिळत नाही हा बहाणा चालणार नाही. भारतातला सामान्य माणूस आता या खाद्य वस्तूंसाठी चार पैसे जादा
खर्चायला तयार आहे. बाजारात तेलाची किंमत वाढली आहे. तेल १०० रुपये प्रति किलोच्या पुढे गेले आहे. भाज्यांचे दर ५० ते १०० रुपये प्रति किलो होतील असे कधी स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते पण तसे झाले आहे. दाळींच्या किंमतीही शतक ठोकण्याच्या विचारात आहेत. अजून काय महाग होत आहे याची यादी मोठी आहे. पण ही महागाई झाली तरीही लोक या वस्तू खरेदी करीतच आहेत.  दाळ महाग झाली म्हणून ती कोणी खरेदीच केली नाही असे काही घडत नाही. महाग असली तरीही महागाईच्या नावाने बोटे मोडत का होईना पण लोक ही भाजीही खरेदी करीत आहेत आणि तेल खाणेही काही सोडत नाहीत.        असे होण्याचे उघड कारण आहे. महागाई कल्पनातीत आहेच पण तिच्या नावाने बोटे मोडणारचे उत्पन्नही कल्पनातीत वाढले आहे. आपला पगार ३० हजार रुपये होईल अशी कल्पना कोणा शिक्षकाने दहा वर्षांपूर्वी केली होती का? बांधकामावरच्या मजुराने ३०० रुपये दिवसाची मजुरी मिळेल असे कधी स्वप्नही पाहिले नसेल.  त्यांची क्रयशक्ती वाढल्याने व्यापारी त्यांना टमाट्याचा भाव ५० रुपये सांगताना कचरत नाहीत. पण या क्रयशक्तीचा आणि वाढलेल्या भावाचा फायदा शेतकर्‍यांना मिळत नाही. शेतकर्‍यांचा माल खरेदी करताना दलाल आणि व्यापारी संगनमत करून तो पडत्या किंमतीलाच घेतात. लोकांच्या वाढत्या उत्पन्नाचा फायदा घेऊन व्यापारी त्यांना कांदा २० रुपयांनी विकत आहेत पण तो शेतकर्‍यां कडून खरेदी करताना दोन रुपयानेच घेत आहेत.  लोकांच्या ऐपतीचा आणि क्रयशक्तीचा शेतकर्‍यांना काहीच फायदा नाही. ही स्थिती व्यापार्‍यांना आज बरी वाटत आहे पण असा सतत भरडला जात असलेला शेतकरी शेती सोडून अन्य कामावर जायला लागला आहे. त्याचा परिणाम शेती उत्पादनात घट होण्यावर होत आहे आणि उत्पादन कमी झाल्याने टंचाई निर्माण होऊन पुन्हा भाव वाढत आहेत.

Leave a Comment