भूखंड घोटाळ्यात विरोधी पक्षही सामील असल्याचा नारायण राणे यांचा आरोप

मुंबई, दि. ९ – ‘कॅग’च्या फुटलेल्या अहवालात काँग्रेसच्या आठ आणि राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांची नावे असल्याचा आरोप विधानपरिषदेत माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी केला होता. सोमवारी नारायण राणे यांनी शिवसेना – भाजपच्या आमदारांचीही नावे भूखंड घोटाळ्यात असल्याचा आरोप केला. या आरोपानंतर विरोधी पक्षाने विधानपरिषदेत गोंधळ घातला. विरोधकांनी सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत ठिय्या दिला आणि कॅगच्या अहवालावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली. त्यावेळी संसदीय कार्य राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी कॅगचा अहवाल १६ तारखेला मांडण्यात येणार असल्याचे सांगितले.
  गेल्या बुधवारी रामदास कदम यांनी कॅगचा अहवाल व सिडी सादर केली होती. त्यात राज्य सरकारचे समारे १० मंत्री सरकारी भूखंड घोटाळ्यात सामील असल्याचा गौप्यस्फोट केला होता. सोमवारी कदम यांनी विधानपरिषदेत या मंत्र्यांवर कारवाई करण्याची तसेच कॅगच्या अहवालावर चर्चा करण्याची मागणी केली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी सरकार शेवटच्या दिवशी कॅगचा अहवाल सादर करेल आणि त्यावर चर्चा होऊ देणार नाही, असा आरोप केला. तर सरकार कॅगच्या अहवालापासून पळ काढत असल्याचा आरोप कदम यांनी केला.  
  यावेळी उद्योगमंत्री नारायण राणे यांनी विरोधी पक्षाच्या अनेक नेते आणि आमदारांनी माफक दरात सरकारी जमिनी घेतल्या आहेत त्याची नावे आपल्याकडे आहेत असे जाहीर केले. कॅगचे आक्षेप म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप विरोधक करीत असतील तर विरोधी सदस्यांनीही भ्रष्टाचार केला असे म्हणायचे का ? असा प्रश्न नारायण राणे यांनी केला.
राणे आणि विरोधक यांच्यात शब्दीक चकमक झाली, त्यामुळे राणे यांनी जाहीर केलेली नावे आणि चकमकीमधला आक्षेपार्ह भाग कामकाजातून काढून टाकण्याचे निर्देश उपसभापतींनी दिले. दरम्यान, भाजपा आमदार देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांना जाहीर आव्हान देत राणे यांनी आपल्यावरील आरोप सिध्द करुन दाखवावेत असे सांगितले. तर विधानसभेत आपल्यावर हे आरोप झाल्यास आपण हक्कभंग आणू असेही सांगितले.

Leave a Comment