पोलीस निरीक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी बबनराव पाचपुतेंची चौकशी

अहमदनगर, दि. ९ – दहा वर्षांपूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीत कारवाई न करण्याकरिता दबाव टाकल्याने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव पाचपुते जबबादार असल्याच्या तक्रारीवरून पाचपुते यांची चौकशी करावी, असे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक सुब्रमण्यम यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णा प्रकाश यांना दिले आहेत. पोलीस महासंचालकांच्या या आदेशामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
  दहा वर्षांपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान एका वाहनातून पोलिसांनी काही पैसे जप्त केले होते. त्यावेळी गुन्हा दाखल करू नये यासाठी पाचपुते यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक शिंदे यांच्यावर दबाव टाकला होता. या दबावातूनच शिंदे यांनी स्वतःच्या पिस्तुलने गोळी झाडून आत्महत्या केली, असा आरोप अहमदनगर येथील लोकक्रांती दलाचे अध्यक्ष हेमंत ढगे यांनी पोलीस महासंचालकांकडे केलेल्या तक्रार अर्जात केला आहे. तसेच श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय नेते बाळासाहेब नाहाटा हे या प्रकरणात साक्षीदार असल्याचा दावाही त्यांनी  केला आहे. ढगे यांच्या तक्रारीची दखल घेत पोलीस महासंचालकांनी या प्रकरणी चौकशी करून कार्यवाही करावी, असा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णा प्रकाश यांना दिला आहे. दरम्यान, ढगे यांचा पोलीस महासंचालकांकडे केलेला तक्रार अर्ज जिल्हा पोलिसांकडे आला असून त्यानुसार चौकशी केली जाईल, असे पोलीस अधीक्षक कृष्णा प्रकाश यांनी सांगितले.

Leave a Comment