पुण्याजवळ नक्षलवादी प्रशिक्षण शिबीर झाल्याचे एटीएस तपासात उघड

पुणे दि.९- नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आणि नक्षलवादी चळवळीत सहभागी असल्याच्या संशयावरून दहशतवाद विरोधी पथकाने गेल्या वर्षी पुण्यातून तसेच राज्याच्या विविध भागातून अटक केलेल्या सात पुरूष व चार महिलांच्या चौकशीत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पुण्यापासून ५० किमीवर असलेल्या  खेड तालुक्यातील खुडे ब्रुद्रुक येथील शेतकर्‍याच्या जागेत जुलै- ऑगस्ट २०१० या काळात बंदी असलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया(एम) च्या सदस्यांनी १५ दिवसांचा ट्रेनिंग कॅम्पच घेतल्याचे उघड झाले असून या शिबिरात सात युवक व चार महिला सामील होत्या असेही समजले आहे.
   ज्या शेतकर्‍यांच्या जागेत हे शिबिर घेण्यात आले त्याला आदिवासी प्रश्नांबद्दल अभ्यास शिबिर असल्याचे व त्यासाठी पुणे व मुंबई येथील शिक्षक आल्याचे सांगण्यात आले होते. या शिबिरात अटक करण्यात आलेला वरीष्ठ सीपीआय-एम राज्य प्रमुख मिलिद तेलुंबडे उफ ज्योतिराव उफ बडा दीपक व त्याची पत्नी अंजेली सोनटक्के उफ साधना उफ राही उफ इस्कारा सीपीआय-एम गोल्डन कॅरिडॉर कमिटी, सचिव यांनीच तरूणांना नक्षली आदर्शवादाचे धडे दिले असल्याचेही समजले आहे. त्याचवेळी नवीन सदस्यांची भरतीही करण्यात आली होती.
   प्रदीप हा पुणे मनपाच्या वाहन विभागातील कर्मचारी संबंधित जागामालकाचा नातेवाईक असून तो पुण्याच्या सांस्कृतिक गट कबीर कलामंचशी संबंधित आहे. त्याच्या माध्यमातूनच पुण्यातील युवकांशी संपर्क साधून त्यांना या नक्षली चळवळीकडे आकर्षित करून घेण्यात येत होते असेही एटीएसने केलेल्या चौकशीत स्पष्ट झाले आहे.
  गेल्याच महिन्यात पुण्याच्या  एस.एम. जोशी फौंडेशनच्या पत्रकारभवनात नक्षलवाद्यांनी पत्रके चिकटविली होती आणि त्यात त्यांच्या अटक करण्यात आलेल्या नेत्यांची बिनशर्त सुटका करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या प्रकरणाचा तपासही दहशतवाद विरोधी पथकच करत असून वरील गटाचा त्यात संबंध असावा असा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. नक्षलविरोधी कारवाई पथकाचे डीआयजी व्ही.पी. मिश्रा म्हणाले की नक्षलवाद्यांनी आपले संपर्क जाळे मजबूत करण्याचा प्रयत्न चालविला असून पुण्यासारख्या शहराची त्यांनी याकामी निवड केली असल्याचे दिसून येत आहे. कारण पुण्यासारख्या शहरात त्यांना लपण्यासाठी अनेक जागा उपलब्ध आहेत तसेच त्यांना वैद्यकीय उपचाराची सोयही येथे होऊ शकते.

Leave a Comment