आयात-निर्यातीतील तूट तीन पटीने वाढणार

मुंबई, दि. २७ – कच्चे तेल व सोन्याच्या आयातीमध्ये दिवसागणिक होत असलेल्या वाढीमुळे देशाचा आर्थिक समतोल ढासळला आहे. निर्यातीच्या तुलनेत या दोन वस्तूंमुळे आयात बिलांमध्ये मोठी वाढ होत असून यामुळे पुढची चार वर्षे व्यापारी तुटीचा आकडा सरकारसाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यातच रूपयाच्या घसरणीचाही मोठा फटका बसून आयातीवरील खर्च वाढत आहे.
  चालू आर्थिक वर्षातील पहिल्या ११ महिन्यांमध्ये सोने व कच्च्या तेलाची मोठी आयात करण्यात आली आहे. यामध्ये तेलाच्या आयातीमध्ये ४१ टक्क्यांची वाढ झाली असून सोन्याची ५५ अब्ज डॉलर्सची आयात करण्यात आली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात व्यापारी तूट १८० अब्ज डॉलर्सच्या आसापास जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
  असोचेम ने केलेल्या सर्व्हेनुसार येत्या काही वर्षांमध्ये देशाची व्यापारी तूट वाढणार असून आर्थिक वर्ष २०१५-१६ पर्यंत तूट तिपटीने वाढेल. २०१०-११ मध्ये व्यापारी तूट १३०.५ अब्ज डॉलर्स होती. आयात अशाच प्रकारे वाढत राहिल्यास २०१५-१६ पर्यंत आयातीचा आकडा ८५८.६ अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल असा अंदाज आहे.
  तेलाची आयात नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे असोचेमने म्हटले आहे. अन्यथा येत्या चार वर्षांमध्ये आयात बिलांमध्ये तीन पटीने वाढ होईल. केवळ कच्च्या तेलाच्या आयातीवर नियंत्रण न आणता सोने आयातीलाही वेसण घालावी लागणार आहे. सोने सुरक्षित गुंतवणूक म्हणून चांगलेच लोकप्रिय झाल्यामुळे सोन्याची मागणी मोठया प्रमाणात वाढली आहे. यामुळे गुंतवणुकदारांचे प्रबोधन करून सोन्याच्या खरेदीपेक्षा इतर पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करताना निर्यात वाढविण्यासही उत्पादन प्रकल्पांना सक्षम करण्याची गरज असल्याचे व उत्पादनवाढीमुळे निर्यात वाढेल, ज्यामुळे तूट कमी होण्यास मदत होईल असेही असोचेमने म्हटले आहे.

Leave a Comment