महायुतीच्या भविष्याबाबत शिवसेनाप्रमुखांसोबत बैठक – आठवले

पुणे,दि.८ – महायुतीवर कोणत्याही प्रकारे मी नाराज नाही, मला खासदार पदाची युतीकडून कोणतीही अपेक्षा नव्हती, मनोहर जोशींच्या खासदार पदाचा कालावधी संपल्यानंतर युतीकडून मला खासदारकी मिळेल अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती, माझी नाही. या आठवड्यामध्ये शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबत चर्चा करणार आहे. यामध्ये महायुतीमध्ये आरपीआयच्या कार्यकत्यांच्या भविष्याबाबत चर्चा करणार आहे. असे आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले म्हणाले की, महाराष्ट्रावर २५०हजार  कोटीचे कर्ज आहे. राज्यामध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल प्रमाणात असतानाही राज्यामध्ये दुष्काळ स्थिती आहे. पूर्वी पाटबंधारे विभागाला धरण बांधण्यासाठी १०० कोटीं खर्च येत होता. पण धरणे वेळेवर बांधली नसल्याने आता तीच धरणे बांधण्यासाठी हजार कोटीच्या घरात खर्च येत आहे. आघाडीच्या सरकारमुळे राज्यावर भयानक स्थिती आली आहे. २०१४च्या विधानसभेवर महायुतीचा झेंडा फडकणार. यासाठी महायुतीबरोबर युती करण्यात आली आहे. शिवसेनेबरोबर वैचारिक मतभेद आहेत. पण त्यांच्याबरोबर फक्त राजकीय मैत्री केली आहे.
अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनाला आमचा पाठिबा आहे. अण्णांवर आमचा विश्वास आहे, पण त्यांच्या सहकाऱ्यांवर विश्वास नाही. अण्णांनी भ्रष्टाचारासाठी आंदोलन करावे, व्यक्तिदोष करावा. पण कोणत्याही पक्षाचा दोष करू नये.
शिक्षक मतदार संघाप्रमाणे सरपंचासाठीही प्रत्येक जिल्ह्यातून मतदार संघ असावा. प्रत्येक जिल्ह्यातून एक तरी सरपंच आमदार व्हावा यासाठी मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार आहे. मराठा-ब्राह्मण सामाजाला आरक्षण दिले पाहिजे, मुंबई -कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्या पावसाच्या पाण्याचा उपयोग करण्यासाठी एखादी तज्ज्ञ समिती नेमण्याची गरज आहे. पाण्याचे नियोजन करताना, प्रथम पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे नंतर उद्योगासाठी देण्यात यावे.महायुतीमध्ये आरपीआयच्या कार्यकर्त्यांना योग्य संधी न मिळाल्याने कार्यकर्ते काही प्रमाणात नाराज झाले आहेत.पण त्यांची नाराजी लवकरच दुर करू असेही ते म्हणाले.

Leave a Comment