यंदा मान्सून सरासरीपेक्षा अधिक बरसण्याचा अंदाज

पुणे दि.६- मान्सूनचे अंदाज अधिक अचूक पद्धतीने देता यावेत यासाठी हवामान शास्त्रज्ञांनी शोधलेल्या नवीन तंत्रानुसार यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त बरसेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुण्याच्या इंडियन ट्रोपिकल मेटेरॉलॉजी संस्थेने देशातील अन्य कांही हवामान संशोधन संस्थाच्या मदतीने हे नवे तंत्र विकसित करण्याचे काम हाती घेतले असून या नव्या तंत्रानुसार प्रथमच मान्सूनचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या तंत्राचा वापर करून निघालेले निष्कर्ष हे अधिक समाधानकारक असल्याचे संस्थेचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व वरीष्ठ अधिकारी डी.एस.पै यांनी सांगितले.
  दरवर्षी एप्रिल अखेर अथवा मे महिन्याच्या सुरवातीलाच नवीन वर्षातला मान्सून कसा बरसेल याचा अंदाज वेधशाळेतर्फे जाहीर केला जातो. भारतासारख्या देशात मान्सून कसा बरसणार यावरच बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात.परिणामी सर्वसामान्य शेतकर्‍यांपासून ते अर्थतज्ञ आणि नियोजन विभागही मान्सून अंदाजांच्या प्रतीक्षेत असतात. एकदा हे अंदाज जाहीर झाले की हे अंदाज लक्षात घेऊन अर्थतज्ञ व नियोजनकार देशाची आर्थिक व अन्य नियोजने ठरवितात तर शेतकर्‍यांनाही यंदा पीकपाणी कसे असेल आणि जनावरांना पुरेसा चारा मिळेल वा कसे या प्रश्नांची थोडीफार उत्तरे आणि अंदाज मिळू शकतात.
  गेली कांही वर्षे सातत्याने मान्सूनचा पाऊस चांगला होत आहे. यंदाही तो सरासरी गाठेलच असा अंदाज वर्तविण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Comment