मालदा रूग्णालयात दोन दिवसांत ११ नवजात बालकांचा मृत्यू

कोलकाता, दि. ७ – मालदा जिल्ह्यातील मालदा महाविद्यालय आणि रूग्णालयात  दोन दिवसांत ११ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत या रूग्णालयात २० तर वर्षभरात २१० नवजात बालकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्यू पावलेल्या ११ बालकांपैकी सहा बालके जन्माने फक्त २८ दिवसांची होती. बालकांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही.
  नवजात बालकांची विशेष काळजी घेण्यासाठी नवीन रूग्णालय उभारण्यात आले आहे आणि याच ठिकाणी या ६ बालकांवर उपचार सुरु होते तर बाकीच्या बालकांना नेहमीच्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. ही सर्व बालके ग्रामीण रूग्णालयातून आलेली आहेत. कमी वजन व श्वासोच्छवासाच्या त्रासाने ही बालके ग्रासली आहेत.
  मागील काही वर्षात पश्चिम बंगाल व जवळच्या जिल्ह्यात नवजात बालकांच्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. गेल्या वर्षात ऑक्टोबर २५ ते २८ दरम्यान १६ नवजात बालकांचा बी. सी. रॉय रूग्णालयात मृत्यू झाला. या अगोदर १८ जुलै २०११ ला १८ नवजात बालकांचा मृत्यू झाला. बातमीनुसार बुर्डवानच्या मेडिकल महाविद्यालय आणि रूग्णालयात गेल्या वर्षात १२ नवजात बालकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

Leave a Comment