भुजबळांच्या एमईटीमध्ये धर्मादाय आयुक्तांनी केली पाहणी १७८ कोटींच्या घोटाळा प्रकरणी ‘जैसे थे’चे आदेश

मुंबई, दि. ७ – राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी ते अध्यक्ष असलेल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट या वांद्रे येथील संस्थेच्या जागेचा वापर व्यक्तिगत आणि व्यावसायिक कामांसाठी करुन रुपये १७८ कोटींचा घोटाळा केल्याच्या तक्रारीवरुन शनिवारी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने पाहणी केली. या कारवाईच्यावेळी तक्रार आणि संस्थेचे विश्वस्त सुनील कर्वे यांना मात्र संस्थेच्या आवारात प्रवेश नाकारण्यात आला. शनिवारी सहाय्यक धर्मादाय आयुक्त मंगेश देशपांडे यांनी एमईटी संस्थेत आठव्या तसेच नवव्या मजल्यावर भुजबळ कुटुंबियांच्या मालकीच्या ‘इदिन फर्निचर्स’ या कंपनीचे कार्यालय असल्याच्या आरोपांची पाहणी धर्मादाय आयुक्तांनी केली. यावेळी संस्थेचे विश्वस्त आणि उपाध्यक्ष तसेच या प्रकरणातील तक्रारदार सुनील कर्वे यांना भुजबळ यांच्या वकिलांनी धर्मादाय आयुक्तांसोबत संस्थेत प्रवेश देण्यास नकार दिला. कर्वे यांच्यावतीने त्यांचे प्रतिनिधी जावू शकतात असे सांगत कर्वे यांना रोखण्यात आले अशी माहिती कर्वे यांनी पत्रकारांना दिली.
  येत्या १२ तारखेला या प्रकरणाची सुनावणी होणार असून तोपर्यंत येथील सर्व गोष्टी ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत. या प्रकरणात भुजबळ यांनी संस्थेचा अशैक्षणिक कामाकरिता वापर करुन काही कोटी रुपयांची देणी थकवल्याचा मुख्य आरोप कर्वे
यांनी केला आहे. या संस्थेच्या आवारात राजकीय कार्यक्रम तसेच संस्थेच्या विश्रामगृहाच्या व्यक्तिगत कामांसाठी वापर आणि आठव्या तसेच नवव्या मजल्यावर ‘इदिन फर्निचर’ या कुटुंबियांच्या शोरुम तसेच अंतर्गत सजावटीच्या व्यवसायाचे कार्यालय थाटण्यात आल्याचे कर्वे यांनी धर्मादाय आयुक्त तसेच आर्थिक गुन्हे शाखेत केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
  या प्रकरणी धर्मादाय आयुक्तांना आपण माहिती दिली असून ते योग्य ती निर्णय घेतील असे कर्वे म्हणाले. सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ हे नाशिक येथे असून पत्रकारांनी या विषयावर छेडले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला, या प्रकरणात जे काही बोलायचे आहे ते न्यायालयात बोलू असे भुजबळ म्हणाले.

Leave a Comment