जातीचा प्रभाव कायम आहे

पजाबच्या राजकारणात, समाजकारणात आणि विशेषतः धर्मकारणात सर्वात मोठे पद प्राप्त करणार्‍या बीबी जागीर कौर यांना न्यायालयाने पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा फर्मावली आहे. या बाबतीत न्यायालयाने आपले काम चोख पार पाडले आहे. कसलेही दडपण येऊ न देता न्याय दिला आहे. पण जनतेची मनस्थिती फार वाईट आहे.  आपल्या मुलीच्या संशयास्पद  मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप लावून जागीर कौर यांना ही शिक्षा झाली असली तरी जनतेतला निदान एक वर्ग तरी जागीर कौर यांचे समर्थन करीत आहे. यामागे जातीच्या सन्मानाची भावना आहे. जागीर कौर यांच्या मुलीने आपल्या पेक्षा कनिष्ठ जातीतल्या मुलाशी लग्न केले होते आणि त्या लग्नातून ती गरोदर होती. अशा मुलीला शिक्षा झाली पाहिजे अशी भावना जातीच्या विचारा बाहेर जाण्यास तयार नसलेल्या काही लोकांच्या मनात अजूनही आहे. महाराष्ट्रात गेल्याच महिन्यात असा एक प्रकार घडला आहे. ज्यात परजातीतल्या मुलाशी लग्न करू पाहणार्‍या मुलीला तिच्या बापानेच मारून टाकले. जागीर कौर या राज्याच्या मंत्री आहेत.  शीख  पंथाच्या सर्वोच्च मानल्या जाणार्‍या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी या समितीच्या प्रमुखही आहेत. ही  समिती एक मोठे प्रस्थ आहे. कारण तिच्याकडून हजारो गुरुद्वारे, अनेक शिक्षण संस्था यांचे नियमन केले जात असते. या संस्था केवळ पंजाबात नाहीत तर हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान याही प्रांतात आहेत. अशा सर्वोच्य यंत्रणेच्या प्रमुखाला अशी शिक्षा झाली आहे. ही शिक्षा अपेक्षितच होती कारण  या प्रकाराचा तपास सीबीआय करीत होती.त्यामुळे तिच्यावर राज्य सरकारचा दबाव येऊन प्रकरण दाबले जाईल अशी भीती नव्हती. जागीर कौर यांची मुलगी हरप्रीत कौर हिचा मृत्यू संशयास्पद रित्या झाला होता. तिच्यावर घाईघाईने अंत्यविधी करून पुरावा नाहीसा करण्याचा प्रयत्न झाला होता. या सगळ्या गोष्टी उघड होत्या. त्यामुळे जागीर कौर यांना शिक्षा होण्याची शक्यता होतीच. या प्रकरणात मुलीला डांबून ठेवणे, तिच्या मनाविरुद्ध तिचा गर्भपात करणे, खून आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे असे आरोप ठेवण्यात आले होते. आणि त्या आरोपांवरून  खटला जारी होता. पण जागीर कौर यांच्या समर्थकांच्या दृष्टीने  समाधानाची बाब अशी की, त्यांच्यावर खुनाचा आरोप शाबीत झाला नाही. त्यांना झालेली शिक्षा अन्य आरोपांवरून झाली आहे. म्हणून ती पाच वर्षांची आहे.
    खुनाचा गुन्हा शाबीत झाला असता तर त्यांना किमान जन्मठेपेची शिक्षा झाली असती. पण पाच वर्षांच्या शिक्षेवर भागले. जागीर कौर यांना आपल्या मुलीला मारायचे होते असे दिसत नाही. त्यामुळे या प्रकाराला ऑनर किलिंगचा प्रयत्न असे म्हणता येत नाही मात्र ऑनर किलिंगच्या मागे जी जातीय अहंकाराची भावना असते ती या प्रकारामागे नक्कीच आहे. या प्रकरणात खानदान की इज्जत का सवाल समोर आला असावा असे दिसते.  या प्रयत्नात ती मरण पावली कारण सहा महिन्यांचा गर्भ पाडण्याचा प्रयत्न केला तर गर्भवतीचा मृत्यू ओढवत असतो.  तसेच झाले असावे. जागीर कौर यांचे बेगोवाल हे गाव आहे कपूरथळा जिल्हयात. त्यांच्या गावापासून जालंधर शहर केवळ २० किलो मीटर अंतरावर आहे पण, त्यांनी गंभीर अवस्थेतल्या आपल्या मुलीला लुधियानाच्या रुग्णालयात नेले. तिकडे नेले जात असताना वाटेतच ती मरण पावली. तिला विष देण्यात आले आणि त्यामुळे ती मरण पावली असा आरोप आहे पण जागीर कौर यांनी तिला डिहायड्रेशन झाल्यामुळे ती मरण पावली असा बचाव केला आहे. तो मानला तरी जालंधरच्या ऐवजी लुधियानाला का नेले हा प्रश्न शिल्लक राहतोच.    
        हा प्रकार घडला तेव्हा जागीर कौर यांना या आपल्या जावयाची माहिती असणारच. म्हणूनच त्यांनी आपल्या मुलीला कोंडून ठेवणे वगैरे प्रकार केले आहेत.  अशा प्रकारात मुलीच्या कुटुंबाला आपला अपमान झालाय असे वाटतेच पण जातीतल्या लोकांचेही तसेच मत असते. अशाच प्रकारांतून ऑनर किलिंगचे प्रकार घडत असतात. अशा वातावरणात फिर्याद नोंदवणार्‍यांना पोलिसांचे सहकार्य मिळत नाही. अशा प्रकारच्या हत्या म्हणजे आपापसातला मामला आहे असे मानले जाते. पोलीसही त्यांची फार दखल घेत नाहीत. कमलजीत सिंग यालाही तसाच अनुभव आला म्हणून त्याने उच्च न्यायालयाची दारे ठोठावली. न्यायालयाने त्याची दखल घेऊन सीबीआय चौकशीचा आदेश दिला. या तपासात जागीर कौर या अपराधी ठरल्या आहेत. त्यांच्यासोबत अन्य दोघांना शिक्षा झाल्या आहेत.
इथपर्यंत हा प्रकार असा आहे पण अशा प्रकारात मुलीला मारले ते योग्यच झाले असे म्हणणार्‍यांची संख्या मोठी असते. याही प्रकरणात तसाच अनुभव येत आहे. जागीर कौर यांना शिक्षा सुनावण्यात आली त्या दिवशी त्यांच्या गावात बंद पाळण्यात आला. काही लोकांनी  निषेध मोर्चाही काढला. जनतेची ही प्रतिक्रिया मोठीच खेदजनक आहे. तोही एक काळजीचा विषय आहे.

Leave a Comment