काँग्रेसच्या पराभवाची कारणे शोधणार- सुशीलकुमार शिदे

नवी दिल्ली, दि. ७ – देशातील पाच महत्वाच्या राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अपयशी ठरलेल्या काँग्रेस पक्षाच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी संरक्षणमंत्री ए. के. अॅन्टोनी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षांतर्गत समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये अॅण्टोनी यांच्यासमवेत केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा समावेश आहे. ही समिती उत्तर प्रदेश, पंजाब आणि गोव्यात झालेल्या पक्षाच्या दारूण पराभवाचा तसेच उत्तराखंडमधील राजकीय स्थितीचा देखील आढावा घेणार आहे. ही समिती एप्रिल अखेरपर्यंत आपला अहवाल पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सुपूर्द करणार आहे.
  अॅण्टोनी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीतील सदस्यांनी गेल्या काही दिवसात पंजाब आणि उत्तराखंड काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांशी आणि आमदार-खासदारांशी चर्चा करून, पक्षाच्या पराभवाची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी गठित केलेल्या या अनौपचारिक समितीचा उद्देश २०१४ साली होणार्‍या मध्यावधी निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीत सुधारणा व्हावी, असा असल्याचे समजते. या समितीच्या अहवालानंतर पक्षातील प्रस्थापित नेत्यांची झाडाझडती घेतली जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment