‘आशिर्वाद’ सोसायटी घोटाळा, हर्षवर्धन पाटलांची खोटी कागदपत्रे – वाय. पी. सिंह यांचा आरोप

मुंबई, दि. ७ – कॅगच्या अहवालात राज्याच्या अनेक मंत्र्यांच्या घोटाळ्याची जंत्री उघडकीस आली आहे. मात्र, प्रत्यक्ष कागदपत्रे समोर आलेली नाहीत. अंधेरी येथील ‘आशिर्वाद’ सोसायटीला तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांनी प्लॉटला मंजुरी दिली. याच सोसायटीत सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्नीच्या नावे खोटी माहिती देऊन कोट्यवधी रुपयांचा फ्लॅट लाटला. या सोसायटीत काही मंत्री, त्यांचे नातेवाईक, सरकारी बाबू यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा फलॅट घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप निवृत्त आय. पी. एस. अधिकारी वाय. पी. सिंग यांनी शनिवार पत्रकार परिषदेत केला.
  या प्रकरणी आपण कागदपत्रांचा पाठपुरावा करीत असून लवकरच जनहित याचिका न्यायालयात दाखल करुन दोषींवर कारवाईची मागणी करणार असल्याचे सिंग यांनी सांगितले. या प्रकरणी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, सन २००३-०४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी माजी राज्यमंत्री सुनिल देशमुख व आताचे आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांचे नाव नसलेल्या सोसायटीला अंधेरी येथील प्लॉट नं. ३ ई. हा शैक्षणिक संस्थेला देण्यात येणारा प्लॉट दिला. वास्तविक वित्त विभागाचा आक्षेप असताना व मंजुरी नसताना त्यासाठी वित्त सचिवपदी चित्कला जोशी यांची नियुक्ती करुन तशी मंजुरी सोसायटीला देण्यात आली. विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होण्यापूर्वी (१६ जाने.२००३ ला) हा प्लॉट दिला.
  सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा शुभदा सोसायटीत पत्नीच्या नावे फलॅट असताना पाटील यांनी त्यांच्या आई रत्नप्रभा पाटील यांचे संपूर्ण कौटुंबिक उत्पन्न २६ हजार रुपये दरमहा दाखवून ‘आशिर्वाद’मध्ये फलॅट लाटण्याचा प्रयत्न केला. मात्र, उत्पन्न जास्त असल्याने प्रयत्न असफल झाले. त्यानंतर हर्षवर्धन यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील यांनी मासिक उत्पन्न ६ हजार रुपये दर्शवून फलॅट लाटला. ‘आर्शिवाद’ सोसायटीत खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन १०७६ चौ. फुटाचा फलॅट पाटील यांनी लाटला. या २१ मजली सोसायटीत ४२ फलॅट आहेत. एका फलॅटची किमत साडेतीन कोटी रुपये आहे. या सोसायटीत विधानसभा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, अन्य काही सरकारी बाबू यांचेही फलॅट आहेत. एकूण सर्व फलॅटची किमत १५२ कोटी रुपयांपर्यंत आहे. या सोसायटीला प्लॉट देतांना माजी महसूल मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झाली होती.
  या सोसायटीत मंत्री, त्यांचे नातेवाईक, ८-१० अधिकारी खासदार, आमदार, नेते आदींचे फलॅट आहेत. या सर्व प्रकरणात मंत्र्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी सरकारी बाबूंनी संगनमताने फसवणूक केली आहे. सरकारी अधिकारी, मंत्री यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे, असे वाय. पी. सिंग म्हणाले. मुंबईत असे अनेक सोसायट्यांमध्ये घोटाळे झाले असून ते एक-एक करुन बाहेर काढण्यात येतील, असेही सिंग म्हणाले.

Leave a Comment