आयपीलसाठी गहुंजेत कडक बंदोबस्त; रविवारी रंगणार पहिला सामना

पुणे, दि. ७ – पुण्याजवळ गहुंजे येथे झालेल्या सुब्रतो रॉय सहारा क्रिकेट स्टेडियमवर रविवारी पहिला सामना रंगणार आहे. यासाठी येथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षेसाठी पुणे ग्रामीणचे पंधराशे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. रविवारी रात्री आठ वाजता पुणे वॉरियर्स आणि किग्ज इलेव्हन पंजाब यांच्यामध्ये लढत होणार असून या सामन्याआधी रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयपीएल सीझन ५ मधील नऊ सामने या मैदानावर होणार आहेत.
  रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता होणा-या रंगारंग उद्घाटनपर कार्यक्रमात अभिनेत्री प्रियांका चोप्रा, बिपाशा बसू, दिया मिर्झा, प्रिती झिटा, नेहा धुपिया, समिरा रेड्डी, जकलीन फर्नांडिस आदी आपली कला सादर करणार आहेत. याशिवाय बिग बी अमिताभ बच्चन यांचा विशेष कार्यक्रम हे यातील प्रमुख आकर्षण असणार आहे. यानंतर १२० जणांचे ढोल लेझीम पथक आपली कला सादर करणार आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्टेडियमवर पाण्याच्या बाटल्या, नेलकटर, खाद्यपदार्थ नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षता घेऊन प्रत्येकाची तपासणी करण्यात येणार आहे. स्टेडियमकडे जाण्याच्या मार्गात बदल करण्यात आला असून पुण्यातून जाणारी चारचाकी वाहने पुणे-मुंबई महामार्गाने किवळे पुलाच्या अगोदर सर्विस रोडने तर सर्व दुचाकी वाहने मामुर्डी गावातून स्टेडियमकडे वळतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Leave a Comment