
वॉशिग्टन, दि. ३० – भारत आणि अमेरिका या दोन देशांमधील सुरक्षा संबंध अधिक दृढ होत आहेत, असे पेंटागॉन या अमेरिकन सुरक्षा संस्थेमधील जेम्स मीलर या अधिकार्याने सांगितले.
सध्या भारत आणि अमेरिकेमध्ये देशांतर्गत सुरक्षा संबंधावर चर्चा, संयुक्त लष्करी अभ्यास, व्यापारी संबंधांना संरक्षण, सैन्याचे आदानप्रदान आणि शस्त्रास्त्र सहकार्य आदी विषयांवर सकारात्मक चर्चा सुरू आहे. या सर्व गोष्टी दोन्ही देशांत मजबूत सुरक्षा संबंध असल्याचे दाखवून देत आहेत असे मीलर म्हणाले. गेल्या दशकात भारत-अमेरिका सुरक्षा संबंधामध्ये आमुलाग्र बदल झाला आहे, असे नमूद करताना दोन्ही देशांनी सागरी सुरक्षा, व्यापारी सुरक्षा, शस्त्रास्त्रे संशोधन आणि विकास यातील सहकार्यावर भर दिला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, सामाईक धोक्यांवर गुप्त माहितीचे आदानप्रदान आणि इंडो-अफगाणिस्तान आणि हिंदी महासागर क्षेत्रात स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठीही दोन्ही देशांनी एकत्र काम केले पाहिजे या कडेही त्यांनी लक्ष वेधले.