चीनी कार्गो जहाजावरील अपहृतांची सुटका

तेहरान, दि. ७ – सोमाली चाच्यांनी अपहरण केलेल्या चीनी कार्गो जहाजासह २८ कर्मचार्‍यांची सुटका करण्यात  आल्याची माहिती तेहरानमधील चीनी दुतावासाने दिली.
  इराणमधील दक्षिणेकडील छबाहर बंदरानजीक ओमन समुद्रात झिआंगहुमेन जहाजाचे शुक्रवारी सोमाली चाच्यांनी अपहरण केले होते. सदर जहाज पूर्व चीनमधील नानजींग ओसियन शिपिग कंपनीचे आहे. शांघायपासून या जहाजाने प्रवासास सुरूवात केली होती. सिंगापूर येथे काही माल उतरविण्यासाठी जहाज थांबले होते. नंतर जहाजाने इराणमधील इमाम कोहिमनी बंदराकडे वाटचाल केली आणि तेव्हाच जहाजाचे अपहरण करण्यात आले. सुमारे नऊ  सोमाली चाच्यांनी जहाजावर हल्ला केला, बंदुकीच्या फैरी झाडल्या आणि कर्मचार्‍यांना ताब्यात घेतले.
  अपहृतांची सुटका करण्यासाठी इराण नौसेनाच्या दोन युद्धनौका सहभागी झाल्या आणि अपहृत जहाजाचा पाठलाग करून सोमाली चाच्यांना शरण येण्यास सांगितले. त्यामुळे चाच्यांनी आपली शस्त्रे पाण्यात टाकून शरणागती पत्करली.
  दरम्यान, जहाजावरील कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलावीत, असे तेहरानमधील चीनी दुतावासाने इराणच्या सरकारी विभागांना सांगितले आहे.  

Leave a Comment