गोव्यात लवकरच एटीएसची स्थापना; मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा कंदील

पणजी, दि. २ – गोव्याच एटीएस (अँटी टेररीस्ट स्कॉड) निर्माण करण्यास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मान्यता दिली असून एटीएस व सागरी सुक्षा दल ही काळाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
  यापूर्वीच्या दिगंबर कामत सरकारातील गृहमंत्री रवी नाईक यांनी एटीएसचा प्रस्ताव रद्द केला होता. गोव्याला एटीएसची गरज नाही असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, ही काळाची गरज असून दहशतवादासारख्या मोठ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, एटीएस आवश्यक असल्याचे पोलिस मुख्यालयात वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी झालेल्या बैठकीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पोलिसांकडून लोकांना चांगल्या वर्तनाची अपेक्षा आहे. पोलिसस्थानकात येणार्‍या नागरिकांना चांगली वागणूक मिळायला हवी, असे मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना बजावले.
  अमली पदार्थ रॅकेट, तसेच गुन्हेगारी उखडून काढताना पोलिसांनी कर्तव्यात कुचराई होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. तसेच कोणत्याही तक्रारीनंतर एफआयआर नोंदविणे बंधनकारक असून हे काम निष्ठापूर्वक होणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.अमली पदार्थांमुळे गोव्याची बरीच बदनामी झाली आहे. ही विषवल्ली उखडून काढण्यासाठी पोलिसांनी वचनबद्ध होण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment