गझलसाठी गुरुकुल स्थापन करण्याचा विचार – भीमराव पांचळे

नागपूर, दि. – गझलच्या क्षेत्रात गायक कमी झाले. या क्षेत्रात नवीन चांगले गायक कलावंत आणि शायर समोर यावेत म्हणून गझलसाठी गुरुकुल स्थापन करण्याचा विचार असून त्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे गजलवाझ भीमराव पांचाळे यांनी सांगितले. महाराष्ट्र वृत्तपत्र लेखक असोसिएशनच्या तिसर्‍या राज्यस्तरीय  शब्द साहित्य  संमेलनाच्या निमित्ताने प्रकट मुलाखतीवेळी ते बोलत होते.
  ते पुढे म्हणाले की, गझल हा आनंददायी काव्य प्रकार आहे. सामाजिक आशय आणि मानवी वेदनांची अभिव्यक्ती म्हणजे गझल आहे. गझल म्हणजे वेदना महसूस करण्याचा एक सोहळा असतो. सगळ्यांच्या आयुष्यात फक्त वेदना येतात, असे नाही पण व्यक्त होणार्‍याने ही वेदना समजून घेतली पाहिजे आणि गझल गायक ही वेदनाच अधिक परिणामकारकतेने पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असतो असे पांचाळ म्हणाले.  ऐकणार्‍याला आशयाच्या अवती भवती घुटमळत ठेवणे, हे गझलकाराचे काम आहे. गझल स्वरबद्ध करणे कठीण आहे, कारण त्यात मोठा आशय सामावलेला असतो. त्या आशयाला धक्का न लावता स्वरांनी सजविणे ही कसरतच असते असेही त्यांनी सांगितले. गझल बहुआयामी असते आणि ती स्वरबद्ध करताना त्याचे अनेक आयाम समजावून घ्यावे लागतात. त्यामुळेच आपण शेकडो वेळा गझल वाचतो असेही भीमराव पांचाळ म्हणाले.