काठमांडू, दि. ६ – लष्कराच्या दोन तुकड्यांनी जानेवारी महिन्यात राजधानी दिल्लीकडे कूच केल्याचे वृत्त म्हणजे केवळ मूर्खपणा आहे, अशा शब्दांत लष्करप्रमुख जनरल व्ही.के.सिंह यांनी कथित आरोपांचा समाचार घेतला. अशा कहाण्या म्हणजे लष्कराच्या व लष्करप्रमुखांच्या विश्वासार्हतेवर चिखलफेक कऱण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन व्ही.के.सिंह यांनी केले.
दरम्यान देशभरात खळबळ उडविणारी ही बातमी केंद्रातील एका वजनदार मंत्र्याने हेतुपुरस्सरपणे पेरल्याची चर्चा च्या राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे ‘दि संडे गार्डियन‘ या इंग‘जी दैनिकाने म्हटले आहे. तर ‘दिल्लीकडे कूच‘ ही मूळ बातमी प्रसिद्ध करणार्या ‘इंडियन एक्सप्रेस‘ या दैनिकाने आपल्या दाव्यावर ठाम राहण्याचा पवित्रा स्वीकारला आहे. परिणामी परस्परविसंगत बाबी उघड होत असून, या प्रकरणातील गोंधळात भरच पडली आहे.
‘इंडियन एक्सप्रेस‘ च्या वृत्तानुसार १६ जानेवारी रोजी केंद्र सरकारला कोणतीही पूर्वसूचना न देता लष्कराच्या दोन तुकड्यांनी देशाची राजधानी दिल्लीकडे कूच केले. यात हिस्सारहून निघालेले रणगाडा पथक निजाफगढकडे तर आग्रा येथील ‘एअरबोर्न ५० पॅराबि‘व्रिगे गेड‘ ही तुकडी पालमच्या दिशेने रवाना झाल्याचे इंटेलिजन्स ब्युरोला समजले. ही बातमी निश्चित होताच केंद्रीय गृह मंत्रालय व संरक्षण मंत्रालयात एकच खळबळ माजली व या तुकड्यांना परत फिरविण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर सुरू झाले.
यावेळी मलेशियाच्या दौर्यावर असलेले संरक्षण सचिव शशिकांत शर्मा यांना तातडीने मायदेशी बोलविण्यात आले आणि पंतप्रधानांना देखील १७ तारखेला पहाटे याबाबत अहवाल देण्यात आला. मात्र संरक्षण मंत्रालयाचे महासंचालक लेफ्ट. जन. ए. के. चौधरी यांनी ही बाब लष्कराच्या नित्याच्या सरावाचा भाग असल्याचे स्पष्टीकऱण दिल्यामुळे नंतर या तुकड्यांना त्यांच्या मूळ छावण्यांकडे रवाना करून, प्रकरणावर पडदा पाडण्यात आल्याचा ‘इंडियन एक्सप्रेस‘ चा दावा आहे. या दाव्याचे मंगळवारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह व संरक्षणमंत्री ए.के.ऍन्टोनी यांनी स्पष्ट शब्दांत खंडन करीत लष्कराची प्रतिष्ठा कलंकित न करण्याचे आवाहन केले.
तर ‘दि संडे गार्डियन‘ ने केंद्रातील एका ज्येष्ठ व प्रभावशाली मंत्र्यालाच या बातमीबद्दल आरोपीच्या पिंजर्यात उभे केले आहे. या मंत्र्याचे त्याच्या नातेवाईकाच्या माध्यमातून शस्त्रास्त्र व्यापार्यांच्या लॉबीशी जवळचे संबंध असल्याचे बोलले जाते. ही लॉबी व्ही.के.सिंह यांना लष्करप्रमुख पदावरून लवकरात लवकर दूर करण्यासाठी इच्छुक असल्याचेही ‘दि संडे गार्डियन‘ च्या वृत्तात म्हटले आहे. त्यामुळे या मंत्र्याने सदर बातमी पेरून लष्करप्रमुखांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पण पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांकडून अपेक्षित प्रतिक्रिया न झाल्यामुळे या नेत्याचा मुखभंग झाल्याचा दावा ‘दि संडे गार्डियन‘ ने केला आहे.
या सर्व विसंगत बातम्यांमुळे भारताची आणि भारतीय लष्कराची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम होत असून, आता सरकार, लष्कर आणि प्रसारमाध्यमांनीही या प्रकरणावर पडदा टाकावा, अशी सूचना सामान्य नागरिकांकडून केली जात आहे. तर या गंभीर आरोपांची पाळेमुळे खोदून यातील दोषी व्यक्तींना कठोर शासन करण्याची मागणी एका निवृत्त वरिष्ठ लष्करी अधिकार्याने केली आहे.