राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर होवू दे- हर्षवर्धन पाटील यांचे जोतिबाला साकडे

कोल्हापूर, दि. ६ – यंदा चांगला पाऊस पडू दे आणि राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर होऊन राज्यातील शेती सुजलाम सुफलाम व्हावी यासाठी राज्याचे सहकारमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दख्खनचा राजा श्री जोतिबास शुक्रवारी साकडे घातले.
  श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त पालकमंत्री पाटील यांनी श्री जोतिबाचे दर्शन घेऊन पूजा केली. त्यांच्या हस्ते मानाच्या पाडळी व विहे येथील सासनकाठीचे पूजन झाले. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
  पालक मंत्री म्हणाले की, राज्याच्या काही भागात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यावर उपायोजना करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहेच. पण येणा-या पावसाळयात राज्यात सर्वदूर चांगला पाऊस व्हावा आणि राज्यातील शेती सुजलाम सुफलाम व्हावी. कारण शेती आणि शेतकरी हाच राज्याचा केंद्रबिदू आहे असेही त्यांनी सांगितले.
  राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दुष्काळी भागांचे दौरेही केले आहेत. त्यांनी दुष्काळी भागातील अधिका-यांची बैठक बोलावली असून त्यामध्ये ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
  जोतिबा देवस्थानच्या यात्रेला दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढतच आहे. हे लक्षात घेता भाविकांना चांगल्या पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी विकास आरखडा तयार करण्यात येत आहे. एकेरी वाहतूक, भक्त निवास आदींचा यामध्ये विचार करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
    दरम्यान, जोतिबाच्या नावानं चांगभलच्या गजरात, गुलाल खोब-याच्या उधळणीत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा आदी राज्यांतून आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत जोतिबाची यात्रा भक्तीमय वातावरणात पार पडली. पालखीच्या मिरवणुकीला ढोलताशे व हलगीच्या निनादात प्रारंभ झाला. गगनाला भिडणा-या सासनकाठया नाचवत व गुलाल-खोबरे उधळत भाविक देहभान विसरून मिरवणुकीत सहभागी झाले होते.

Leave a Comment