
पुणे, दि. ५ – घरच्यांकडून घटस्फोटासाठी सुरू असलेल्या दबावामुळे नैराश्य आलेल्या तरूणाने भारती विद्यापीठ भवन या इमारतीच्या ९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. गुरूवारी सकाळी अलका चौकात हा प्रकार घडला. गर्दीच्या ठिकाणी झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
नवनाथ रोहिदास ठाणेपकर (२८) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवनाथने एक वर्षापूर्वी पानशेत येथील एका तरूणीशी नोंदणी पद्धतीने आंतरजातीय विवाह केला होता. मात्र, विवाह झाल्याची गोष्ट दोघांनीही आपल्या घरी सांगितली नव्हती. त्यामुळे हे दोघेही विवाहानंतरही आपापल्या घरीच राहत होते. काही महिन्यांपूर्वी नवनाथ मुलीच्या घरी लग्नाची मागणी घालण्यासाठी गेला. त्यावेळी मुलीच्या घरच्यांनी नकार दिला आणि हे लग्न मोडण्यास सांगितले. या प्रकाराची कल्पना त्यांनी नवनाथच्या घरच्यांनाही दिली. नवनाथच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध करीत त्याला घटस्फोट घेण्यास सांगितले.
त्यानंतर या दोघांनी भारती भवन येथे असलेल्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. गुरूवारी त्यांच्या अर्जावर सुनावणी होणार होती. नवनाथ आपल्या पत्नीसह सकाळी ११ च्या सुमारास भारती भवन येथे आला. मानसिक तणावातच त्याने इमारतीच्या ९ व्या मजल्यावरून उडी मारली. त्यानंतर तातडीने त्याला नजीकच्या पूना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आत्महत्या करताना नवनाथच्या हातात पत्नीचा फोटो होता.
