घटस्फोटांचे प्रमाण तामिळनाडूत सर्वाधिक

नवी दिल्ली, दि. ५ – पतीच्या अकाली मृत्यूमुळे अगर घटस्फोट घेऊन संसाराला पूर्णविराम दिल्यामुळे, तसेच पतीशी पटत नसल्यामुळे एकाकी आयुष्य जगणार्‍या महिलांचे प्रमाण तामिळनाडू राज्यात सर्वाधिक असल्याची माहिती पुढे आली आहे. २०१० साली झालेल्या सर्वेक्षणानुसार तामिळनाडूतील ८.८ टक्के महिला असे एकाकी आयुष्य जगत आहेत. या आकडेवारीत महाराष्ट्रातील महिला देशात पाचव्या स्थानावर आहेत. तर दिल्लीत अशा एकाकी राहणार्‍या महिलांचे प्रमाण देशात सर्वात कमी म्हणजेच ४.१ टक्के इतके आहे.  
  पतीच्या मृत्यूमुळे, घटस्फोटामुळे अगर पतीपासून फारकत घेतल्यामुळे एकट्या राहणार्‍या १० वर्षे वयापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांची देशातील एकूण संख्या सुमारे ७ टक्के इतकी आहे. याच कारणांमुळे आपल्या पत्नीपासून विभक्त झालेल्या पुरूषांच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास तिप्पट आहे. ‘सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टम २०१०’ हा अहवाल शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. सदर अहवालातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
  आंध्रप्रदेश, केरळ आणि कर्नाटक यांसारख्या मोठया राज्यांमध्ये सुद्धा एकट्या राहणार्‍या महिलांचे सरासरी प्रमाण ८.२ टक्के आहे. तसेच ओडिशा (७.२ टक्के), हिमाचल प्रदेश (७.१ टक्के) आणि महाराष्ट्र (७ टक्के) अशी नोंद करण्यात आली आहे. पुरूषांमधील विधूर, घटस्फोटीत आणि वेगळे राहण्याचे प्रमाण उत्तर प्रदेशमध्ये (३.७ टक्के), पंजाब (३.४), गुजरात आणि मध्यप्रदेश (३.३) आहे. विधवा, घटस्फोटीत महिलांची आकडेवारी पाहिल्यास तामिळनाडूमध्ये सर्वाधिक (१४.५ टक्के), कर्नाटक (१४.२ टक्के), केरळ (१४ टक्के), आंध्रप्रदेश (१३.६) आणि महाराष्ट्र (११.७) एवढी आहे. पश्चिम बंगालमध्ये पुरूषांच्या तुलनेत अशा महिलांचे प्रमाण तब्बल सहा पट अधिक आहे.

Leave a Comment