स्वाईन फ्ल्यूसाठी लसीचे उत्पादन पुन्हा सुरू

पुणे दि.४- स्वाईन फ्ल्यूच्या रूग्णांची वाढती संख्या आणि पुण्यातून तसेच महाराष्ट्रातील अन्य ठिकाणांहून स्वाईन फ्ल्यू प्रतिबंधक लसीला असलेली मागणी लक्षात घेऊन पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने त्यांच्या स्वदेशी बनावटीच्या, स्वस्त, परिणामकारक व नाकावाटे घेता येणार्‍या नॅसोव्हॅकचे उत्पादन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून यावेळी प्रमाणातच ही लस तयार केली जाणार आहे असे समजते. मात्र या लसीच्या गुणवत्ता चाचण्या घेतल्यानंतरच ती मे महिन्यातच बाजारात उपलब्ध होऊ शकणार आहे.
दोन वर्षांपूर्वी म्हणजे २००९ सालात स्वाईन फ्ल्यूचा उद्रेक झाल्यानंतर सिरम इन्स्टिट्यूटने नॅसोव्हॅक ही स्वदेशी लस तयार केली होती आणि ही लस परिणामकारकही ठरली होती. मात्र साथ ओसरताच नागरिकांनी तसेच सरकारनेही लसीकरणाचे काम बंद केल्याने त्यावेळी तयार केलेल्या या लसीचे सुमारे २० लाख डोस संस्थेला लसीची मुदत संपल्याने मागच्या महिन्यातच नष्ट करावे लागले होते व त्यामुळे संस्थेचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे मागणी आल्याशिवाय ही लस पुन्हा तयार न करण्याचा निर्णय संस्थेने घेतला होता.
यंदाच्या मार्चमध्ये एकट्या पुण्यातच या रोगाची लागण झालेले २७१ रूग्ण आढळले तर आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू ही झाला आहे. पुण्यापाठोपाठ मुंबई, नाशिक, नागपूर, सातारा जिल्ह्यातूनही या रोगाची लागण झाल्याच्या केसेस नोंदविल्या जात आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या लसी महाग आहेत आणि त्या इंजेक्शनद्वारेच घ्याव्या लागत आहेत व या सर्व लसी परदेशी बनावटीच्या आहेत. त्यामुळे संस्थेच्या नॅसोव्हॅकला पुन्हा मागणी आली असून ही लस पुन्हा उत्पादित करावी अशी विनंती संस्थेला करण्यात आल्याचे संस्थेचे संचालक डॉ.प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले. अर्थात गुणवत्ता चाचण्या पूर्ण केल्यानंतरच ही लस बाजारात येणार आहे. २००९ सालात स्वाईन फ्ल्यूमुळे ४१४ जणांचा मृत्यू झाला होता तर २०१० सालात याच रोगाने ५२४ जणांचे प्राण महाराष्ट्रात घेतले होते असेही त्यांनी सांगितले.
  दरम्यान एचवन एनवन विषाणूची चाचणी करणार्‍या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे पुणे व राज्याच्या अन्य भागातूनही संशयित रूग्णांच्या घशातील द्राव तपासणीसाठी येत असल्याचे संस्थेच्या उपसंचालक डॉ. मनचंदा यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की या विषाणूत थोडा बदल नक्कीच झाला आहे पण या रोगाची तीव्रता २००९ सालच्या तुलनेत कमीच आहे.

Leave a Comment