बीएसएनएलच्या ‘व्हिडीओ टेलिफोनी’ सेवेचे उद्घाटन

पुणे, दि.२८ – समोरासमोर संवाद साधण्यासाठी आता थ्री जी मोबाईल, लीज लाइनवर आधारित व्हिडीओ कॉन्फरन्स वा इंटरनेटच्या स्काइप सुविधेची गरज उरलेली नाही. ब्रॉडबँड असणारे बीएसएनएलचे सारे ग्राहकही आता अशा प्रकारे परस्परांकडे पाहत गप्पा मारू शकणार आहेत.  साई इन्फोसिस्टिम इंडिया लिमिटेडच्या (एसआयएस) सहकार्याने बीएसएनएलने ‘व्हिडीओ टेलिफोनी’ ही सेवा उपलब्ध केली आहे. या सेवेचे उद्घाटन  पुण्यात करण्यात आले.
बीएसएनएलच्या महाराष्ट्र व गोवा सर्कलचे जनरल मॅनेजर एम. डी.  भाटिया यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एसआयएसचे सीईओ नवीन भसिन, उपाध्यक्ष राजीव गुप्ता, बीसएनलचे एम. के. महिंद्रा उपस्थित होते. राजस्थान, गुजरात पाठोपाठ ही सेवा पुरवणारे महाराष्ट्र तिसरे राज्य ठरले आहे.
यावेळी भाटिया म्हणाले,  मोठ्या उद्योगसमूहांबरोबरच, व्यावसायिकांनाही आढावा बैठका, मुलाखती, प्रशिक्षण शिबिरे आदींसाठी व्हिव्हीओबीबीफ (व्हॉइस अँड व्हिडीओ ओव्हर ब्रॉडबँड) ची ही सेवा उपयुक्त ठरू शकेल. केवळ देशातीलच नव्हे, तर परदेशातील प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठीही तिचा चांगला उपयोग होईल. घरातील संगणकामध्येही आवश्यक संगणक प्रणाली समाविष्ट करून किवा बाजारातील अशा प्रकारची उपकरणे वापरून या सुविधेचा लाभ घेता येईल. त्याद्वारे एका वेळी सात ते पंधरा जणांना परस्परांशी चर्चा करता येईल. मोठ्या आकाराचा टीव्ही अथवा पडदा जोडण्याची सुविधाही यात उपलब्ध आहे. येत्या सहा महिन्यात पाच हजार ग्राहक जोडण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
या सेवेसाठी लागणार्‍या स्क्रीनयुक्त टेलिफोनची किमत १४ हजार ९०० ते ३४ हजार ९०० रुपयांदरम्यान आहे. तथापि, अशी उपकरणे भाडेतत्त्वावरही उपलब्ध करून देण्याची कंपनीची योजना आहे. तीन हजार ते सात हजार रुपये इतकी अनामत रक्कम घेऊन दरमहा दीडशे रुपये भाड्याने ही उपकरणे ग्राहकांना पुरविण्यात येणार आहेत.

Leave a Comment