प्रेक्षकांमुळेच मराठी चित्रपटाला चांगले दिवस – सुकन्या कुळकर्णी

नागपूर, दि. १६ मार्च – अनेकदा चित्रपटांना पुरस्कार मिळाले की त्या चित्रपटाबाबत चर्चा होते. काही लोक तर पुरस्काराच्या दृष्टीने चित्रपट तयार करतात. पण चित्रपट पुरस्कारापेक्षा रसिकांसाठी तयार व्हावेत. सध्या मराठी चित्रपटांना चांगले दिवस येत आहेत आणि त्यात प्रेक्षकांचा मोठा वाटा आहे. रसिकांनी साथ दिली तरच मराठीत दर्जेदार आणि आशयघन चित्रपट तयार होऊ शकतील, असे प्रतिपादन अभिनेत्री सुकन्या कुळकर्णी यांनी नागपुरात व्यक्त केले. मैत्रेयी फांऊडेशनच्या वतीने कॅन्सरग्रस्त महिलांसाठी आयोजित मेळाव्यानिमित्त त्या बोलत होत्या.
  आशयघनता आणि वास्तविकता हे आपल्या कथांचे वैशिष्ट्य आहे. मराठी रसिकांना दर्जा आणि गुणात्मकताच आवडते. तोच रसिकांचा स्थायीभाव आहे. त्यामुळे अकारण भव्यता आणण्यापेक्षा आशयाला भिडणारे चित्रपट मराठीत तयार होतात. पण, मधल्या काळात केवळ व्यावसायिक कारणाने निर्माते मराठी चित्रपटांसाठी मिळत नव्हते. मात्र, चित्रपटांचा दर्जा, त्याला लाभलेले पुरस्कार आणि त्यामुळे होणारी चर्चा यामुळे मराठी चित्रपट राष्ट्रीय स्तरावर वाखाणले गेले. यातूनच मराठीकडे निर्मात्यांचे लक्ष गेले. आता रसिकांचा प्रतिसाद लाभतो आहे. ही साथ रसिकांनी दिली तर मराठी चित्रपट निर्मिती करताना निर्मात्यानीही व्यावसायिकते पलिकडे थोडा विचार करावा असे त्या म्हणाल्या.
  दूरदर्शन मालिकाही मधल्या काळात सासू-सुनांमध्ये अडकल्या पण लोकांना ते आवडत होते. त्यामागे व्यावसायिक कारणे होती. पण मालिकांमध्येही आता चांगल्या मालिका येत आहेत. गेल्या काही दिवसात आपण चित्रपटात काम केले नाही पण चांगले कथानक असले तरी भविष्यात काम करेन. नवी पिढी हुशार आहे. तांत्रिकदृष्ट्या समृद्ध आहे त्यामुळे येत्या काळात मराठी सिनेमा जागतिक स्तरावर सातत्याने उंची गाठत राहील असा विश्वास सुकन्या कुळकर्णी यांनी यावेळी व्यक्त केला.