डॉ.प्रकाश आमटे यांचा जीवनपट रुपेरी पडदयावर

पुणे, दि. १३ – समाजकार्यासाठी मॅगसेसे पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले डॉ.प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार आहे. समाजसेवक बाबा आमटे यांचे सुपुत्र असणारे डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आणि कार्यावर प्रकाश टाकणारी आजपर्यंत अनेक पुस्तके निघाली आहेत. मात्र, त्यांचे समाज कार्य जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचवण्याच्या उद्देशाने दिग्दर्शिका समृध्दी पोरे यांनी या चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरवले आहे.
‘मला आई व्हायचंय’ या चित्रपटाच्या नंतर डॉ पोरे यांची ही दुसरी कलाकृती असणार आहे. डॉ. प्रकाश आणि मंदा यांचे हे समाजकार्य अनेक लोकांनी हेमलकसाच्या जंगलात जाऊन प्रत्यक्ष अनुभकलं आहे. दिग्दर्शिका अॅड. पोरे यांनीही हेमलकसाच्या जंगलात काही महिने राहून त्यांचं कार्य अतिशय जवळून बघितलं आहे.    डॉ. प्रकाश आमटे यांच्या आयुष्यावर आधारीत या चित्रपटाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरु झाली असून चित्रपटाच्या पटकथेची  मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषेत नोंदणी करण्यात आली आहे.  या संपूर्ण उपक्रमासाठी त्यांना समाजातील विविध स्तरांतून सहकार्यही मिळत आहे या चित्रपटाचे परदेशातही चित्रीकरण करण्यात येणार आहे. चित्रपटासाठी नामांकित कलाकार आणि तंत्रज्ञांची निवड करण्यात येत असून डॉ. प्रकाश आमटे आणि मंदा आमटे यांची भूमिका कोण करणार? याबाबत मोठी उत्सुकता आहे.
    गेल्या चाळीस वर्षांपासून गडचिरोली मधील हेमलकसा सारख्या अतिशय दुर्गम जंगलात  डॉ.प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींच्या उत्थानाचं अविरत कार्य करीत आहेत. ज्यावेळी त्यांनी या कामाला सुरुवात केली होती तेव्हा आदिवासी जमातींपर्यंत वीज, शिक्षण, दवाखाना यांसारख्या मुलभूत सुविधाही पोहचल्या नव्हत्या. शिवाय त्यांची भाषाही आपल्यासारखी नव्हती. एकढी सारी आव्हाने असतानाही त्यांनी तिथे शून्यातून एक नवं विश्व निर्माण केले. केवळ आदिवासींसोबतच नाही तर तेथील पर्यावरण आणि प्राण्यांशीही त्यांनी नाते जोडले. आज तेथील स्थानिक आदिवासींसोबत तेथील बिबटे, सिह, साप या सारखे अनेक हिस्त्र पशु पक्षीही त्यांच्या परिवाराचेच सदस्य बनले आहेत.

Leave a Comment